खराब गाडी मिळालेल्या ग्राहकाला 42 लाखांची भरपाई, सुप्रीम कोर्टाचा ‘फोर्ड’ला दणका!

WhatsApp Group

Supreme Court On Ford : सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध कार निर्माता कंपनी फोर्ड इंडिया कंपनीला खराब गाडी बनवल्याबद्दल खरेदीदाराला 42 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यानुसार, पंजाबमधील एका ग्राहकाने फोर्ड टायटॅनियम एंडेव्हर 3.4L गाडी खरेदी केली होती, ज्यात दोष होते. फोर्डने राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, कंपनीने यापूर्वीच 42 लाख रुपयांची नुकसानभरपाई म्हणून 6 लाख रुपये दिले आहेत, त्यामुळे आता 36 लाख रुपये आणि वाहन विमा खर्च 87 हजार रुपये ग्राहकांना परत करावेत. कंपनीने ही रक्कम ग्राहकाला परत करताच, ग्राहक त्याची गाडी फोर्डला परत करेल.

हेही वाचा – भारतातील ‘असं’ गाव जिथे महिला राहतात निर्वस्त्र, नेमकी परंपरा काय?

ग्राहकाने कंपनीकडे तक्रार केली असता त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर खरेदीदाराने पंजाब राज्य ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. तक्रारीत त्याने फोटोसह आयोगाकडे अनेक त्रुटी सांगितल्या, त्यात त्याने सुरुवातीपासून अनेक ठिकाणांहून तेल गळती होत असल्याचाही उल्लेख केला आहे. आयोगाने कंपनीला गाडीचे इंजिन बदलण्याचे आणि गाड़ी गॅरेजमध्ये असेपर्यंत ग्राहकाला प्रतिदिन 2,000 रुपये देण्याचे आदेश दिले. फोर्डने याला असहमती दर्शवून राष्ट्रीय ग्राहक आयोगात आव्हान दिले. तिथेही फोर्डचा दावा फेटाळून लावत राज्य ग्राहक आयोगाचा निर्णय योग्य ठरला.

यानंतरही फोर्डने हार मानली नाही आणि ग्राहक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात अपील केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि आयोगांचा तर्कसंगत निर्णय पाहून सर्वोच्च न्यायालयाने फोर्डला दोषी मानले. पण दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना, फोर्डला कदाचित हे लक्षात आले की या प्रकरणाचा उलटसुलट परिणाम होऊ शकतो, म्हणून त्यांनी ग्राहकाच्या गाडीचे दोषपूर्ण इंजिन देखील बदलले. मात्र असे असतानाही कारची दुरवस्था झाली. कारण गाडीतील इतर दोषांमुळे ग्राहकाला आपली गाडी आरामात रस्त्यावर चालवणे अवघड जात होते.

सर्वोच्च न्यायालयाने हा सगळा गोंधळ संपवला. कंपनीने विम्यापोटी 87,000 रुपये आणि पीडित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून 36 लाख रुपये द्यावे आणि त्याची कार परत घ्यावी, असे न्यायालयाने सांगितले.

90 च्या दशकात अमेरिकन कंपनी फोर्डने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. फोर्डने अनेक वर्षे भारतात नफा मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळू शकले नाही. गेल्या वर्षी, कमकुवत मागणी, स्पर्धकांकडून कमी किमतीची वाहने आणि महिंद्रासोबतचा अयशस्वी संयुक्त उपक्रम यासह अनेक कारणांमुळे कंपनीने भारतातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment