Success Story : जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. अनुभव दुबे (28) जो एकेकाळी UPSC चा उमेदवार होता त्याने ही म्हण खरी ठरवली आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्याने आपला मित्र आनंद नायक सोबत प्रसिद्ध ‘चाय सुट्टा बार’ सुरू केला. अनुभवचे वडील व्यापारी होते. पण आपल्या मुलाने उद्योगपती व्हावे अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अनुभवला UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले. मात्र, अनुभवचे मन केवळ व्यवसाय सुरू करण्याचेच होते. यात त्याला त्याचा शाळेतील मित्र आनंद नायक याने साथ दिली.
आनंदच्या घरीही कपड्यांचा व्यवसाय चालायचा. पण तो थांबला. अनुभवला काही व्यवसाय करायचा आहे हे आनंदला माहीत होते. एके दिवशी फोनवर बोलत असताना आनंदने अनुभवला सांगितले की, जुना व्यवसाय बंद झाला असून आता ते दोघे मिळून काहीतरी नवीन करू शकतात. अनुभवने आई-वडिलांना न सांगता इंदूर गाठले. व्यवसाय सुरू करण्यासाठी दोघांची एकूण 3 लाख रुपयांची बचत होती. अनुभवच्या मनात चहाचे दुकान उघडण्याचा विचार आला. भारतात चहाला खूप पसंती आहे आणि इथे कमी गुंतवणुकीत चांगला परतावा अपेक्षित होता.
हेही वाचा – BMC च्या बजेटमध्ये महिलांसाठी 250 कोटींची तरतूद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुलींच्या वसतिगृहाजवळ दुकान
त्यांनी भंवरकुआन येथील मुलींच्या वसतिगृहासमोर ‘चाय सुट्टा बार’ सुरू केला. या भागात अनेक कोचिंग सेंटर्स होती. म्हणूनच चहाच्या दुकानासाठी ते एक प्रमुख ठिकाण होते. मात्र, असे असतानाही पहिल्या दिवशी फारच कमी लोक त्यांच्या दुकानात आले. असे आणखी काही दिवस चालले. यावेळीही त्याच्या मदतीसाठी मित्रच पुढे आले.
एक विचित्र कल्पना
दुकानात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी असताना अनुभवने त्याच्या मित्रांची मदत घेतली. त्याने आपल्या मित्रांना दुकानात बोलावून बनावट जमाव जमवला. तो त्यांना फुकट खाण्यापिण्याची सोय करत असे. मात्र दुकानात सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांची वर्दळ सुरूच होती. गर्दी पाहून हळुहळू बाहेरचे लोकही दुकानाकडे आकर्षित होऊ लागले. इतकेच नाही तर अनुभवचे मित्र अनेक गर्दीच्या ठिकाणी चाय सुट्टा बारचे नाव घेऊन लोकांना ऐकवायला लावायचे. त्यामुळे लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. अशा प्रकारे चाय सुट्टा बारचा व्यवसाय सुरू झाला.
अनुभव आणि नायक यांनी 6 महिन्यांत 2 राज्यांमध्ये ‘चाय सुट्टा बार’ च्या 4 फ्रँचायझी विकल्या. सध्या त्याची देशात 150 आउटलेट आहेत. या कंपनीची फ्रँचायझी देशातच नाही तर परदेशातही सुरू होत आहे. ‘चाय सुट्टा बार’ दुबई, यूके, कॅनडा आणि ओमान सारख्या देशांमध्ये पोहोचला आहे. कंपनीचा दरवर्षी 100-150 कोटींचा टर्नओवर आहे.