मुलायमसिंह यादव यांचं निधन..! अखिलेश म्हणाले, “माझे बाबा आता राहिले नाहीत”

WhatsApp Group

Mulayam Singh Yadav Passes Away : समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हरयाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल होते. मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव भावूक झाले. ”माझे वडील आणि सर्वजण नेताजी राहिले नाहीत”, असे अखिलेश म्हणाले.

माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी आज सकाळी ८.१५ वाजता अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १ ऑक्टोबरच्या रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना CCU (क्रिटिकल केअर युनिट) मध्ये हलवण्यात आले. मुलायमसिंह यादव यांची प्रकृती गेल्या पाच दिवसांपासून नाजूक होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांचे पुत्र अखिलेश यादव मेदांता रुग्णालयात पोहोचले. गेल्या आठवडाभरापासून अखिलेश सतत मेदांता हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते आणि मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत ते खूप चिंतेत होते.

हेही वाचा – देशाची पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार..! रेल्वेमंत्र्यांची ‘मोठी’ घोषणा; वाचा सविस्तर!

सैफईत होणार अंत्यसस्कार

अखिलेश यादव, त्यांची पत्नी डिंपल यादव, प्रतीक यादव, राम गोपाल यादव, शिवपाल सिंह यादव, धर्मेंद्र यादव, तेज प्रताप यादव यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य गेल्या एक आठवड्यापासून मेदांता येथे होते. त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण भावूक झाले आहेत. मुलायमसिंह यादव यांचे पार्थिव त्यांच्या सैफई या गावी आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथेच त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. नेताजींच्या निधनानंतर सैफईमध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. सर्वजण भावुक झाले असून नेताजींची आठवण करून अनेकांना रडू कोसळले आहे.

नेताजी तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री

मुलायमसिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला. त्यांचे वडील साखरसिंह यादव हे शेतकरी होते. सध्या मुलायम सिंह मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि देशाचे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायमसिंह ८ वेळा आमदार आणि ७ वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. मुलायमसिंह यादव यांनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे २००३ मध्ये निधन झाले. मालती देवी या अखिलेश यादव यांच्या आई होत्या. मुलायमसिंह यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरे लग्न केले. मुलायमसिंह आणि साधना यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment