Receptionist Ankita Bhandari Murder : अखेर तिच्या हत्येचं गूढ उकललं..! BJP नेत्याच्या मुलाला अटक

WhatsApp Group

Receptionist Ankita Bhandari Murder Case : उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातील एका खासगी रिसॉर्टची रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिची हत्या करण्यात आली आहे. तिला डोंगरावरून खाली चिला कालव्यात ढकलण्यात आले. १९ वर्षीय अंकिता १८ ते १९ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. सोशल मीडियावर अंकिताच्या बाजूने मोहीम सुरू होती. तिचा मृतदेह हाती लागला आहे. जिल्हा पॉवर हाऊसजवळील चिला कालव्यात पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली. आरोपीला अटक केल्यानंतर १८ तारखेच्या रात्री तिचा खून झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य याच्यासह तिघांना अटक केली आहे. या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अंकिता जिथे काम करायची त्या रिसॉर्टचा संचालक पुलकित आर्य होता. राज्याचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले, “ही अत्यंत दुःखद घटना आहे. लक्ष्मण झुला पोलीस स्टेशन परिसरात एक खासगी रिसॉर्ट आहे. श्रीकोट गावातील एक मुलगी त्यात काम करायची. ती पाच दिवसांपासून बेपत्ता होती. तिची पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, २४ तासात मुख्य आरोपी पुलकित आर्यसह तीन आरोपींना लक्ष्मण झुला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.”

हेही वाचा – PM नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा कट? ईडीनं केला ‘मोठा’ खुलासा! वाचा…

खोटी कथा सांगितली!

पौरी गढवालमधील श्रीकोट गावात राहणारी अंकिता भंडारी काही महिन्यांपासून गंगा भोगपूर येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. रिसॉर्टचा संचालक पुलकित आर्यनं पोलिसांना सांगितलं, “रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी एका वेगळ्या खोलीत राहत होती. काही दिवसांपासून ती मानसिक तणावातून जात होती. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी आम्ही तिला ऋषिकेशला फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेले होते. तिथून आम्ही रात्री उशिरा परतलो. यानंतर सर्वजण रिसॉर्टमध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या रूममध्ये झोपायला गेले. पण, १९ सप्टेंबरला सकाळी अंकिता तिच्या खोलीतून बेपत्ता होती.” पोलिसांच्या तपासात ही कथा खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

तिघांना अटक!

दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तिचे वडील गंगा भोगपूरला पोहोचले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी रिसॉर्टमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यावेळी प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. यानंतर रिसॉर्ट चालक व कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. याशिवाय उत्तराखंडचे आमदार उमेश कुमार यांच्यासह पत्रकार आणि संघटनांनी अंकिता भंडारी बेपत्ता झाल्याबाबत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. त्यामुळे पोलिसांनी सक्रियता दाखवत रिसॉर्ट संचालक पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहायक व्यवस्थापक अंकित गुप्ता या तीन आरोपींना अटक केली.

हेही वाचा – “सर, आम्ही वर्ल्डकप जिंकून येऊ”, जेव्हा धोनीचा आत्मविश्वास पाहून हादरले होते सिलेक्टर्स!

सीसीटीव्हीत आढळलं सत्य!

सीसीटीव्ही फुटेजच्या रेकॉर्डिंगद्वारे आणि मोबाइलद्वारे सर्वांचे जबाब तपासण्यात आले. १८ सप्टेंबर रोजी ऋषिकेशहून आल्यानंतर आपापल्या खोलीत झोपायला गेल्याचे आरोपींनी सांगितले होते. पोलिसांनी ऋषिकेशला जाताना वाटेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये चार जण निघताना दिसले. पण, परतत असताना सीसीटीव्हीत तीनच जण कैद झाले. यानंतर पोलिसांनी पुलकितसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. नीट चौकशी केली, मग त्यांनी सांगितले की, वाटेत काही गोष्टीवरून अंकिताशी भांडण झाले होते. यानंतर आरोपींनी अंकिता भंडारीला टेकडीवरून कालव्यात ढकलले.

हत्येचं कारण…

पुलकित अंकिताला हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांशी संबंध ठेवण्यास सांगत असे, अंकिता ही गोष्ट सर्वांना सांगत होती. ती वारंवार रिसॉर्टचे वास्तव उघड करण्याची धमकी देत ​​होती. या प्रकरणावरून वाद निर्माण झाला होता. घटनेच्या दिवशी हे चौघे दोन वेगवेगळ्या वाहनांवरून चिला बॅरेजवर गेले होते. तिथे त्यांनी फास्ट फूडसोबत दारू प्यायली. त्यानंतर पुढे ते जाऊन कालव्याच्या काठावर थांबले. इथे पुलकित आणि अंकिता पुन्हा भांडू लागले. दरम्यान, अंकिताने पुलकितचा मोबाईल हिसकावून कालव्यात फेकून दिला. याचा राग येऊन पुलकितने अंकिताला कालव्यात ढकलून दिले. अंकिता दोनदा पाण्यातून वर आली आणि वाचवण्यासाठी आवाज उठवला. मात्र, तिघेही घाबरले आणि पळून रिसॉर्टमध्ये आले. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्यचे वडील आणि भाजप नेते विनोद आर्य यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment