रतन टाटांचं २५ वर्षांच्या ‘दोस्ता’सोबत नवं स्टार्टअप! वाचाल तर तुम्हीही सलाम ठोकाल!

WhatsApp Group

Ratan Tata launched Goodfellows : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता ८४ वर्षांचे झाले असून त्यांना वृद्धांच्या एकाकीपणाची आणि वेदनांची चांगलीच जाणीव आहे. देशातील करोडो वृद्धांची ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. रतन टाटा यांनी एका छोट्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे, जे एकाकीपणानं ग्रस्त असलेल्या वृद्धांना मदत करते.

काय म्हणाले रतन टाटा?

‘गुडफेलोज’ (Goodfellows) या स्टार्टअपच्या शुभारंभाच्या वेळी टाटा म्हणाले, “जोपर्यंत तुम्हाला स्वतःला एकटं वेळ घालवायला भाग पाडलं जात नाही, तोपर्यंत तुम्हाला एकटेपणा किती वाईट आहे हे समजत नाही. म्हातारपणी काळजी घेणारा जोडीदार मिळणं हे एक आव्हान असतं आणि त्यांची वेदना तुम्ही स्वतः म्हातारा होईपर्यंत कळत नाही.” हा स्टार्टअप सुरू केल्याबद्दल त्यांनी तरुण उद्योजकाचेही कौतुक केले. एका अंदाजानुसार, देशात सुमारे १५ दशलक्ष वृद्ध लोक एकटे राहतात. त्यांचं कुटुंब एकतर इथं नाही किंवा परदेशात राहतं.

हेही वाचा – चोर आले आणि चॉकलेट चोरून गेले..! किंमत होती १७ लाख; नक्की वाचा!

स्टार्टअप सुरू करणारा शंतनू कोण आहे?

‘गुडफेलोज’ स्टार्टअप सुरू करणारे शंतनू नायडू हा अवघा २५ वर्षांचा असून तो टाटा कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या शंतनूनं सांगितलं, की त्याला ही सेवा देशभरात सुरू करायची आहे, परंतु त्याच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. शंतनूनं टाटा यांचे वर्णन बॉस, मार्गदर्शक आणि मित्र असं केलं. तो म्हणाला, ”या स्टार्टअपची कल्पनाही माझ्यापेक्षा पाच दशकांनी मोठे असलेल्या रतन टाटा यांना पाहिल्यानंतर आली.”
इंजिनीअरिंग आणि एमबीएचं शिक्षण घेतलेल्या शंतनूनं यापूर्वी रस्त्यावरील कुत्र्यांसाठी एक स्टार्टअपही तयार केलं. मोटापोस नावाचं हे स्टार्टअप भटक्या कुत्र्यांना त्यांच्या गळ्यात एक कॉलर बांधून मदत करतं, ज्यामुळं त्यांची देखभाल करणं सोपं होतं.

हेही वाचा – स्वातंत्र्यदिनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ३ तासात ठार मारण्याची धमकी कुणी दिली?

स्टार्टअप कशी मदत करेल?

गुडफेलोज स्टार्टअपमध्ये सेवा देण्यासाठी, अशा तरुणांची भरती केली जात आहे, जे वृद्धांच्या भावना समजून घेतात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात आणि छोट्या छोट्या कामात मदत करतात. वृद्धांसोबत कॅरम खेळणं, त्यांच्यासोबत वर्तमानपत्र वाचणं, बाहेर फिरायला जाणं आणि त्यांना आराम करण्यास मदत करणं हे या स्टार्टअपचे काम असेल. यामध्ये नोकरी करणाऱ्यांना चांगला पगारही दिला जाईल, मात्र त्याची भरती प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आहे. ही सबस्क्रिप्शन आधारित सेवा सध्या मुंबईत उपलब्ध आहे, जी लवकरच बंगळुरूसह इतर शहरांमध्ये सुरू होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment