जेव्हा एक पत्रकार होतो राष्ट्रपती..! कोण आहेत श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे?

WhatsApp Group

मुंबई : श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. याआधी विक्रमसिंघे सहा वेळा पंतप्रधान राहिले आहेत. याआधी त्यांनी राजकीय गोंधळात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. राजपक्षे देशातून पळून गेले आणि त्यानंतर गोटाबाया काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम करत होते. ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत आज थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत, विक्रमसिंघे यांची भिडत दुल्लास अलाहपेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी होती. सकाळी १० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिलं मत स्पीकरनं तर दुसरं मत रानिल विक्रमसिंघे यांनी दिलं. संसदेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या विक्रमसिंघे यांना १३४ मतं मिळाली. तर दुलास अल्हप्पारुमा यांना ८२ आणि अनुरा कुमार डिसनायके यांना केवळ ३ मतं मिळाली. विक्रमसिंघे यांच्या निवडीनंतर राजधानी कोलंबोमध्ये पुन्हा निदर्शनं होत आहेत. हे आंदोलक विक्रमसिंघे यांनाच विरोध करत आहेत.

चार मतं ठरली अवैध!

२२३ सदस्यांच्या संसदेत दोन खासदार गैरहजर होते आणि एकूण २१९ मतं वैध घोषित करण्यात आली. त्यात चार मतं अवैध ठरविण्यात आली. विक्रमसिंघे यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. तामिळ नॅशनल पीपल्स फ्रंटचे (TNFP) सरचिटणीस आणि खासदार सेलवारसा गजेंद्रन यांनी मतदान केलं नाही. अनेक खासदारांनी यापूर्वीच मतदान केलं आहे.

विक्रमसिंघेंचा कार्यकाळ कधीपर्यंत?

गोटाबाया यांची जागा घेणारा राष्ट्रपती पदाचा उमेदवार त्रिपक्षीय स्पर्धा जिंकेल आणि आधीच गरीब झालेल्या देशाचे नेतृत्व करेल. बेलआऊट पॅकेजसाठी IMFशी चर्चा सुरू आहे. श्रीलंकेत २२ मिलियन लोकांना अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. नवीन अध्यक्ष विक्रमसिंघे माजी राष्ट्रपती राजपक्षे यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत काम करतील.

विक्रमसिंघे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव

रानिल विक्रमसिंघे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते सहा वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पक्षाचा संसदेत एकच खासदार आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार आणि वकील होते. १९७७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक जिंकून विक्रमसिंघे पहिल्यांदाच खासदार बनले. १९९३ मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले.

श्रीलंकेतील प्रभावशाली सिंहली कुटुंबात विक्रमसिंघे यांचा जन्म झाला. वयाच्या २८व्या वर्षी त्यांना उपपरराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले. त्यांच्या कामाच्या क्षमतेनं अल्पावधीतच त्यांनी अनेक नेत्यांना प्रभावित केलं होतं. ५ ऑक्टोबर १९७७ रोजी, विक्रमसिंघे यांना पूर्ण कॅबिनेट पद मिळालं आणि ते युवा व्यवहार मंत्री झाले. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं. विक्रमसिंघे राजकारणात पुढं जात होते. १९९३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रणसिंग प्रेमदासा यांची एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यात हत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान डीबी विजेतुंगा यांना काळजीवाहू अध्यक्ष बनवण्यात आलं. ७ मे १९९३ रोजी विक्रमसिंघे यांची प्रथमच देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Leave a comment