Post Office Scheme : केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी काही अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. त्यात पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेचाही समावेश आहे, जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) आहे. किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर सरकारने व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकता.
नवीन व्याजदर
साधारणपणे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करतात. पैसे दुप्पट करण्यासाठी किसान विकास पत्र देखील खूप लोकप्रिय आहे. रक्कम दुप्पट करण्यासाठी लोक त्यात गुंतवणूकही करतात. सरकारने किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ केली आहे, ज्यामुळे व्याजदर ७.० टक्क्यांवरून आता ७.२ टक्के झाला आहे.
गुंतवणूकदारांना पहिल्या १२३ महिन्यांसाठी गुंतवणुकीवर ७ टक्के व्याज मिळत असे. पण १ जानेवारी २०२२ पासून त्यांना १२० महिन्यांच्या गुंतवणुकीवर ७.२ टक्के दराने व्याज मिळेल. म्हणजेच किसान विकास पत्र योजना आता १० वर्षात मॅच्योर होईल. आता तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला नवीन व्याजदरातून परतावा मिळेल.
हेही वाचा – Upcoming CNG Cars : नवीन वर्षात येणार ‘या’ ५ सीएनजी गाड्या; एकदा पाहाच!
या योजनेअंतर्गत कोणीही १००० रुपये गुंतवून खाते उघडू शकतो. गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. १८ किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक ही योजना खरेदी करू शकतो. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र अंतर्गत खाते उघडू शकता. जर कोणी ही योजना घेतल्यानंतर एक वर्षाच्या आत परत केली तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही.
खाते कसे उघडायचे?
या पोस्ट ऑफिस योजनेत, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कोणतेही प्रौढ खाते उघडले जाऊ शकते. अल्पवयीन व्यक्तीचे वय १० वर्षे पूर्ण होताच त्याच्या नावावर खाते हस्तांतरित केले जाते. किसान विकास पत्र उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुमचे ओळखपत्रही जोडावे. अर्ज आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्राचे प्रमाणपत्र मिळेल.