Pakistan Petrol Diesel Price : आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानातील सरकारने पेट्रोलच्या दरात 12 रुपयांनी मोठी कपात केली आहे. याशिवाय डिझेलही स्वस्त झाले आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी सोमवारी जाहीर केले की, पुढील 15 दिवस पेट्रोलच्या दरात 12 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 30 रुपयांची कपात केली जाणार आहे.
पेट्रोलची नवीन किंमत
सोमवारी आपल्या दूरचित्रवाणी भाषणात ते म्हणाले की पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या आधारे जनतेला जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दार म्हणाले की, आज रात्री 12 वाजल्यानंतर पुढील 15 दिवसांसाठी पेट्रोलच्या दरात 12 रुपयांनी कपात केली जात आहे, त्यामुळे आता पेट्रोलची नवीन किंमत 270 रुपये प्रति लीटर होईल.
रॉकेलही स्वस्त
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 30 रुपयांच्या कपातीनंतर डिझेलची किंमत आता 258 रुपयांपर्यंत खाली येईल. याशिवाय रॉकेल तेलाच्या दरातही 12 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यासह रॉकेल तेलाची नवीन किंमत 164.07 रुपये आणि लाईट डिझेल तेलाची किंमत 12 रुपयांनी कमी होऊन 152.68 रुपये प्रति लिटर होणार आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानची एकूण तेल विक्री वार्षिक 47 टक्क्यांनी घसरून 1.171 दशलक्ष टन झाली, तर जुलै-एप्रिल 2023 या आर्थिक वर्षातील एकूण विक्री 24 टक्क्यांनी घसरून 13.970 दशलक्ष टन झाली.
हेही वाचा – WhatsApp ने आणले नवीन फीचर..! आता लॉक करता येणार चॅट्स; ‘अशी’ आहे प्रोसेस!
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान सरकारने इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ केली होती. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तू आयात करणे शक्य होत नाही. पीठ, तांदूळ, कांदे यासारख्या दैनंदिन वस्तूंच्या किमती पाकिस्तानमध्ये गगनाला भिडल्या आहेत.
पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि ते मदतीसाठी ओरडत आहे. सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे 2019 मध्ये केलेल्या बेलआउट पॅकेज कराराचा पहिला $1.1 अब्ज हप्ता जारी करण्याची सतत मागणी करत आहे. मात्र अद्यापपर्यंत आयएमएफने त्याला मान्यता दिलेली नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!