मुंबई : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात ‘मातृत्व’ या भावनेला लाजवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईनं आपल्या तीन दिवसांच्या नवजात मुलाला जंगलातील पाण्याच्या खड्ड्यात बुडवून ठार केलं. पोलिसांनी निष्पाप मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कौटुंबिक कलह हा प्राथमिक अंदाज लक्षात घेऊन पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झालावाड जिल्ह्यातील कामखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोग्याबेह गावातील आहे. इथं रेखा लोढा हिनं मनोहरथाना रुग्णालयात २० जुलै रोजी मुलाला जन्म दिला. शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रेखाचा पती तिला गावी घेऊन आला होता. त्यानंतर रेखा लोढा अचानक रात्री उशिरा आपल्या नवजात मुलाला घेऊन घराच्या पाठीमागील जंगलातील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात फेकून देऊन परतली.
नातेवाईकांचा संशय..
जंगलातून परतत असताना रेखा हिला तिचे नातेवाईक घराबाहेर दिसले. त्यांना शंका आल्यानं त्यांनी रेखाला मुलाबाबत विचारणा केली. त्यावर तिनं मुलाला वन्य प्राण्यानं पळवून नेल्याची खोटी कहाणी रचली. त्यामुळं घरच्यांचा संशय बळावला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाचा शोध सुरू केला. मात्र त्याचा शोध लागला नाही.
पोलिसांनी केली कसून चौकशी..
यावर रेखाच्या सासरच्यांनी कामखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रेखाची पोलिसांनी तसून चौकशी केली. यानंतर तिनं सगळी खरी गोष्ट सांगितली आणि तिनं मुलाला जंगलातील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात फेकून दिल्याचं सांगितलं. यावरून रेखानं पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी घटनास्थळ गाठलं. तिथं नवजात अर्भक सापडल्यानं तिचा मृतदेह पाण्याच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नवजात बालकाचं शव अकलेरा रुग्णालयात पोस्टमार्टम झाल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.
या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी आई रेखा लोढा हिला ताब्यात घेतलं. पोलीस तिची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. अद्यापपर्यंत महिलेनं मुलाला का मारलं हे सांगितलेलं नाही. पोलीस रेखाच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहेत. मात्र हत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. रेखाला आधीच एक मुलगा आहे. रेखाच्या कुटुंबीयांमध्ये सुरू असलेल्या भांडणाचा पोलीस तपास करत आहेत.