Milk Price Hike : मदर डेअरीने एनसीआरमध्ये फुल-क्रीम, टोन्ड आणि डबल-टोन्ड दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. नवीन किमती २७ डिसेंबरपासून म्हणजेच मंगळवारपासून लागू होतील. मात्र, गाईचे दूध आणि टोकन दुधाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या दुधाच्या किमतीत २४ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे मदर डेअरीने यावर्षी आतापर्यंत पाचव्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.
मदर डेअरी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात दररोज ३० लाख लिटरहून अधिक दूध विकते. मदर डेअरीने सांगितले की, फुल क्रीम दुधाची किंमत आता ६६ रुपये प्रति लीटर झाली आहे, तर टोन्ड दुधाची नवीन किंमत ५३ रुपये प्रति लीटर असेल. त्याचबरोबर दुप्पट टोन्ड दुधाचा दर ४७ रुपये प्रतिलिटर झाला आहे. मात्र, कंपनीने गायीच्या दुधाच्या पिशव्या व टोकन घेतलेल्या दुधाच्या दरात वाढ केलेली नाही.
हेही वाचा – हिवाळ्यात फिरायचंय? नागपूर जवळच्या ‘या’ ठिकाणांना द्या भेट; फॉरेनसारखं वाटेल!
Mother Dairy to hike milk prices by Rs 2/litre in NCR from Tuesday of full-cream, toned, double-toned variants
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2022
दरवाढीचं ‘हे’ कारण
या दरवाढीमागे मदर डेअरीने शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचा खर्च वाढल्याचे कारण सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाच्या खरेदी खर्चात सुमारे २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “दुग्ध उद्योगासाठी हे वर्ष अनपेक्षित राहिले आहे. सणांनंतरही ग्राहक आणि संस्था या दोघांकडूनही मागणी वाढलेली पाहायला मिळत आहे. दुसरीकडे दिवाळीनंतरही कच्च्या दुधाच्या खरेदीला वेग आलेला नाही.
यापूर्वी, २१ नोव्हेंबर रोजी मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये फुल क्रीम दुधात प्रति लिटर १ रुपये आणि टोकन मिल्कच्या दरात २ रुपयांची वाढ केली होती. ऑक्टोबरमध्ये, मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर तसेच उत्तर भारतातील काही भागांमध्ये फुल क्रीम आणि गायीच्या दुधाच्या किमती प्रति लिटर २ रुपयांनी वाढवल्या. मदर डेअरीचे म्हणणे आहे की, दुधाच्या विक्रीतून जे काही उत्पन्न मिळते ते ७५ ते ८० टक्के शेतकर्यांना जाते.