भारतातील ‘या’ राज्यात पेट्रोल 170 रुपये लिटर, गॅस सिलिंडर 1800 च्या वर!

WhatsApp Group

Petrol LPG cylinder Price : या महिन्याच्या सुरुवातीला पसरलेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्याबाहेरील वस्तूंच्या आयातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दुप्पट दराने उपलब्ध होत आहेत. मणिपूरच्या बहुतांश भागात सिलिंडर, पेट्रोल, तांदूळ, बटाटे, कांदे आणि अंडी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची निश्चित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक मांगलेम्बी चानम यांनी सांगितले की, “पूर्वी 50 किलोची तांदूळ 900 रुपयांना मिळत होती, पण आता ती 1800 रुपयांना उपलब्ध आहे. बटाटा आणि कांद्याच्या दरातही 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्याबाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे.

बटाटा 100 रुपये किलो

काळ्या बाजारात गॅस सिलिंडर 1800 रुपयांना मिळतो, तर अनेक भागात पेट्रोलची किंमत 170 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे, असे चनम यांनी सांगितले. ते म्हणाले, “अंड्यांची किंमतही वाढली आहे. 30 अंड्यांचा एक क्रेट 180 रुपयांना मिळत होता, मात्र आता 300 रुपयांना मिळत आहे. ते म्हणतात की जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सुरक्षा दलांनी कडक निगराणी ठेवली आहे, अन्यथा किंमती आणखी वाढू शकल्या असत्या. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या आगमनापूर्वी बटाट्याचे भाव 100 रुपये किलोवर गेले होते.

हेही वाचा – IPL 2023 : साडेतीन ओव्हर, 5 रन्स, 5 विकेट्स आणि 4 रेकॉर्ड्स! आकाश मधवालची धमाल

मणिपूरमधील ज्या जिल्ह्यांना हिंसाचाराचा फटका बसला नाही, तेथे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. तामेंगलाँग जिल्ह्यात रेशन दुकान चालवणाऱ्या रेबेका गंगमेई म्हणाल्या, “आवश्यक वस्तूंच्या, विशेषतः तांदळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तर आमच्या जिल्ह्यात हिंसाचार झाला नाही. केवळ मांसाच्या किमतीत कोणताही बदल दिसून आला नाही, कारण ते इतर राज्यांतून आयात केले जात नाही आणि स्थानिक लोकांकडूनच खरेदी केले जाते.”

उखरुल जिल्ह्यातील एका सरकारी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पामचुइला काशुंग यांनी सांगितले की, त्यांचा जिल्हा नागालँडपासून जवळ आहे, जिथून माल येतो, त्यामुळे किमती फार वाढल्या नाहीत. मात्र, असे असूनही तांदूळ आणि इतर काही वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मणिपूरमध्ये काय झाले?

मैती समाजाने अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली होती. याच्या निषेधार्थ 3 मे रोजी इंफाळ खोऱ्यात आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. यानंतर मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला, ज्यामध्ये 70 हून अधिक लोक ठार झाले. विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, ज्यामुळे राज्यातील ट्रकच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या मोर्चामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होऊ शकतो, अशी भीतीही वाहतूकदारांमध्ये होती. त्यामुळे राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. या हिंसाचारात इंफाळ पश्चिम जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास राज्यात सुमारे 10,000 लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा दल राज्यातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

मणिपूरच्या एकूण लोकसंख्येच्या 53 टक्के मैती समुदाय आहे, या समुदायाचे लोक बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. त्याच वेळी, नागा आणि कुकी जमाती मिळून मणिपूरच्या लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत. हे दोन्ही समुदाय प्रामुख्याने मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment