मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला लागून असलेल्या मलिहाबादला आंबा उत्पादनाचं केंद्र म्हटलं जातं आणि येथील आंबा उत्पादक कलीमुल्ला हे आंब्याच्या नवीन जाती तयार करण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत ‘ऐश्वर्या’ आणि ‘सचिन’ यांसारख्या आंब्यांचे अनोखे प्रकार देणाऱ्या कलीमुल्ला खान यांनी फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या दोन स्वादिष्ट जाती तयार केल्या आहे. विशेष म्हणजे त्यांनी आंब्याच्या या जातींना ‘सुष्मिता आंबा’ आणि ‘अमित शाह आंबा’ अशी नावं दिली आहेत. या दोन्ही जाती त्यांनी आपल्या बागेत तयार केल्या आहेत.
सुष्मिता सेनचं नाव का?
या आंब्यांना फिल्मस्टार आणि भाजप नेत्याचं नाव देण्यामागं त्यांचा स्वतःचा तर्क आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुंदर आणि सुडौल शरीरयष्टीच्या मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या नावावरून त्यांनी ‘सुष्मिता आंबा’ हे नाव ठेवलं आहे. सुष्मिता सेन तिच्या सौंदर्यामुळं, धर्मादाय कार्यामुळं चर्चेत असतात. त्यांनी दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यामुळे तिच्या शरीरासोबत मनाचं सौंदर्यही दिसून येतं म्हणूनच त्यांनी हे नाव ठेवलं.
हेही वाचा – She Is Worthy! चक्क ‘थॉर’नं केलं भारताच्या मीराबाई चानूचं कौतुक; म्हणाला…
अमित शाहचं नाव का?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावानं ‘अमित शाह आंबा’ आहे. कारण शाह बलवान माणूस आहे, असं ते सांगतात. यापूर्वी कलीमुल्ला यांनी मुलायम आणि नमो आंब्यांचं वाण देखील विकसित केलं आहे.
‘ऐश्वर्या आंबा’
कलीमुल्ला यांनी पहिल्यांदाच ‘ऐश्वर्या आंबा’ची जात तयार केली. ते म्हणाले, ”सुष्मिता सेनबद्दल मला कुणीतरी खूप नंतर सांगितलं. त्याचं सौंदर्य जगात कायम राहिलं पाहिजे आणि लोकांनीही त्यांना चांगल्या मनाची व्यक्ती म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे.”
कलीमुल्ला खान यांनी अनेक दशकांपासून आंब्याच्या विविध संकरित जाती विकसित केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत मुलायम आंबा, नमो आंबा, सचिन आंबा, कलाम आंबा, अमिताभ आंबा आणि योगी आंबा अशा ३०० हून अधिक जाती विकसित केल्या आहेत. या कार्यासाठी त्यांना २००८ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.