Indias new CDS : केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. बिपिन रावत यांच्यानंतर ते दुसरे सीडीएस असतील. ४० वर्षे लष्करात सेवा बजावलेले अनिल चौहान गेल्या वर्षीच निवृत्त झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कमांड सांभाळल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचाही मोठा अनुभव आहे.
कोण आहेत अनिल चौहान?
१८ मे १९६१ रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे १९८१ मध्ये भारतीय लष्कराच्या ११ गोरखा रायफल्समध्ये भरती झाले होते. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी उत्तर कमांडमधील महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले. नंतर लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भागात एका कॉर्प्सची कमान सांभाळली. त्यानंतर ते सप्टेंबर २०१९ पासून पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले.
हेही वाचा – IND Vs SA : सापासारखा घुसला बॉल..! अर्शदीपच्या ‘इनस्विंगर’वर मिलरच्या दांड्या गुल; पाहा Video
उत्तराखंड के सपूत लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान (से.नि.) जी को चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) नियुक्त किए जाने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
हमें पूर्ण विश्वास है कि आपके कुशल नेतृत्व में भारतीय सेना सदैव की भांति राष्ट्रीय सुरक्षा के क्षेत्र में नया कीर्तिमान स्थापित करेगी। pic.twitter.com/6JUgWzJ7rA
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) September 28, 2022
अनेक सन्मान
त्यांनी महासंचालक मिलिटरी ऑपरेशन्सचा कार्यभारही सांभाळला आहे. याआधी चौहान यांनी अंगोलामध्ये संयुक्त राष्ट्र मिशन म्हणूनही काम केले आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक बाबींमध्ये योगदान दिले. लष्करातील त्यांच्या विशिष्ट सेवेबद्दल, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयाने या वर्षी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) च्या नियुक्तीशी संबंधित तीन संरक्षण दलांच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली होती. ज्यामध्ये केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल किंवा जनरल पदावरील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बनण्याची परवानगी दिली होती. यासाठी संरक्षण मंत्रालयाने जमीन, हवाई आणि नौदलाच्या सेवा कायद्यात बदल केले.