

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या सौंदर्य आणि चमकदार अभिनयासाठी जगभर लोकप्रिय आहे. आपल्या कामाबद्दल गंभीर आणि स्वभावानं शांत असलेली कतरिना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. १९८३ मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेली कतरिना ही एक ब्रिटिश मॉडेल आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पसंतीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकलेली कतरिना यावर्षी लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी पती अभिनेता विकी कौशलसोबत मालदीवला गेलीय. तिच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही गोष्टी…
डब व्हायचा आवाज…
कतरिनाचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण काही खास नव्हतं. ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या कतरिनाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, सुरुवातीच्या अपयशामुळं कतरिनानं हार मानली नाही आणि आज तिचा समावेश इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होतो. मूळची परदेशी असल्यामुळे कतरिनाला हिंदी बोलण्यात खूप त्रास होतो. यामुळंच सुरुवातीला कतरिनाच्या चित्रपटांमध्ये तिचा आवाज डब करण्यात आला होता.
१४व्या वर्षीच मॉडेलिंग…
कतरिनाला मनोरंजन विश्वात असं स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. सात भावंडांपैकी एक असलेली कतरिना तिच्या आईच्या खूप जवळ आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, तिनं लहान वयातच शिक्षण सोडल्यानंतर वयाच्या १४व्या वर्षीच मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मॉडेलिंगच्या जगात यश मिळवल्यानंतर तिनं चित्रपटांमध्ये हात आजमावला. यादरम्यान सुरुवातीच्या अपयशानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही आणि यश संपादन केलं.
कतरिना कैफच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. तिचा बूम हा बी-ग्रेड चित्रपट होता, ज्यामध्ये तिनं अनेक बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटात गुलशन ग्रोवर आणि अमिताभ बच्चनही दिसले होते. या चित्रपटानंतर तिला राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ चित्रपटात छोटी भूमिका देण्यात आली. कतरिनानं या छोट्याशा भूमिकेतून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. यानंतर तिनं सलमान खानसोबत मैंने प्यार क्यूं किया या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाच्या यशानंतर कतरिनाची लोकप्रियता खूप वाढली. त्यानंतर प्रत्येक प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याला कतरिनासोबत काम करायची इच्छा होती. अशा रीतीनं हळूहळू कतरिना इंडस्ट्रीत रुळली.
कतरिनाची संपत्ती..
चांगल्या चित्रपट कारकिर्दीत कतरिनानं अनेक हिट-सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये नमस्ते लंडन, हमको दीवाना कर गये, सिंग इज किंग, एक था टायगर, टिग जिंदा है, अजब प्रेम की गजब कहानी यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना एका चित्रपटासाठी १०-११ कोटी रुपये घेते. गेल्या वर्षी आलेल्या एका रिपोर्टनुसार, कतरिना जवळपास २२४ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. इतकेच नाही तर चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई करते. कतरिनानं बर्फी, चेन्नई एक्सप्रेस, गुंडे, बाजीराव मस्तानी, ये जवानी है दिवानी या हिट चित्रपटांना रिजेक्ट केलं होतं.