मोठी बातमी…! धनंजय चंद्रचूड होणार भारताचे ५०वे सरन्यायाधीश; वाचा त्यांच्याबद्दल…

WhatsApp Group

Indias Next Chief Justice Of India : भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बैठकीत त्यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह न्यायमूर्ती चंद्रचूड हे ९ नोव्हेंबर रोजी भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांपेक्षा जास्त असेल. लळित यांनी केंद्र सरकारला त्यांच्या पत्राचे उत्तर पाठवले आहे, ज्यामध्ये सरकारने त्यांना पुढील सरन्यायाधीश यांच्या नावाबद्दल विचारले होते. आता सरन्यायाधीशपदी आणखी एक मराठी व्यक्तीची निवड होणार आहे.

न्यायमूर्ती लळित ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. ९ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील आणि १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होतील. प्रोटोकॉलनुसार, विद्यमान सरन्यायाधीश यांना त्यांच्या उत्तराधिकारीची शिफारस करणारे औपचारिक पत्र सरकारला पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर हे पत्र पुढच्या सरन्यायाधीशांकडे सुपूर्द केले जाते आणि कायदामंत्र्यांना पाठवले जाते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी १९९८ मध्ये भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले आहे. त्यांनी २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते मुंबई उच्च न्यायालयाशी देखील संबंधित आहेत आणि २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची उन्नती झाली. भारताचे १६ वे आणि सर्वाधिक काळ काम करणारे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती वाय.व्ही. चंद्रचूड यांचे ते पुत्र आहेत.

हेही वाचा – ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यावर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले…

११ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेले न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स (LLM) आणि फॉरेन्सिक सायन्स (SJD) मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ द विटवॉटरसँड, दक्षिण आफ्रिकेत व्याख्यानेही दिली आहेत.

न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची ऑगस्टमध्ये भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती लळित यांनी जून १९८३ ते डिसेंबर १९८५ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केले. जानेवारी १९८६ मध्ये त्यांनी दिल्लीत प्रॅक्टिस सुरू केली आणि एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. टूजी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a comment