Sambhajirao Chavan Adarsh Agricultural Journalist Award : महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं प्रथम वर्षीचा संभाजीराव चव्हाण आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार Abp Majha चे पत्रकार गणेश लटके यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी गुजरात केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष रवी सोलंकी, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील, केळी उत्पादक संघाचे राहुल बच्छाव उपस्थित होते.
कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर केलेलं लिखाण, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न याबद्दल गणेश लटके यांना आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बनाना सिटी असणाऱ्या ‘सावदा’ इथं पहिल्या राज्यस्तरीय केळी पिक परिषदेचं आयोजन (Banana conference) करण्यात आलं होतं. यावेळी कृषी पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या पहिल्या केळी परिषदमध्ये ‘केळीरत्न कार्यगौरव’ पुरस्कारचे वितरण देखील करण्यात आलं. एकरी 30 टनाच्या पुढं केळीचं उत्पादन काढणाऱ्या 19 शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी केळी क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सरकारकडं वेगवेगळ्या मागण्या देखील करण्यात आल्या.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण..! जाणून घ्या 10 ग्रॅमचा रेट
पुरस्कारामुळ आणखी लढण्याचं बळ मिळालं
मला मिळालेला कृषी पुरस्कार हा आजी आजोबांच्या संस्कारांचा, आई वडिलांच्या कष्टाचा आणि मला आतापर्यंत मार्गदर्शन केलेल्या सर्व गुरुजनांचा असल्याचं मत पुरस्कारार्थी गणेश लटके यांनी व्यक्त केलं. या पुरस्कारामुळं आणखी लढण्याचं बळ मिळालं आहे. शेती टिकली तर देश टिकेल. त्यामुळं पत्रकारितेच्या माध्यमातून मी कायम शेती, माती, ग्रामीण अर्थव्यस्थेचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे गणेश लटके म्हणाले. आज राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, एकीकडे अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळ नुकसान तर दुसरीकडे सरकारच्या धोरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणं, खते दिली जातात, काही वेळेला बोगस रोपे सुद्धा दिली जातात, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. हातात माल असेल तेव्हा बाजारात दर नसतो, या सर्व प्रश्नांच्या कचाट्यातून सुटायचे असेल तर शेतकऱ्यांना एक व्हावं लागेल. आपल्या प्रश्नांवर लढावं लागेल असे गणेश लटके म्हणाले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!