खरंच मंकीपॉक्स विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक आहे का?

WhatsApp Group

मुंबई : जगातील ७०हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूनं थैमान घातलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) देखील मंकीपॉक्स विषाणूच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अमेरिकेसह जगातील काही भागांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणं आणखी वाढू शकतात अशी भीती आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. कोरोना साथीच्या आजारापेक्षा मंकीपॉक्सचा संसर्ग अधिक धोकादायक ठरू शकतो का, याबद्दल आरोग्य तज्ज्ञ चिंतित आहेत.

मंकीपॉक्स आणि कोविड महामारीच्या स्वरूपामध्ये फरक असल्याचे डॉ. विनय मिश्रा यांनी म्हटलं आहे. मंकीपॉक्स ही महामारी नाही आणि कोविड संसर्गानं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. मंकीपॉक्स हा सुद्धा एक विषाणूजन्य आजार आहे परंतु तो अत्यंत संसर्गजन्य आजारांच्या यादीत समाविष्ट नाही.

मंकीपॉक्स हा मुख्यत: मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये पसरणारा रोग आहे. डब्ल्यूएचओच्या मते, उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात मांकीपॉक्सची प्रकरणं दिसून आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगाच्या अनेक भागांमध्ये मंकीपॉक्सच्या संसर्गाची प्रकरणं समोर येत आहेत ही चिंतेची बाब आहे.

कोविडपेक्षा मंकीपॉक्स जास्त धोकादायक आहे का?

ओटागो विद्यापीठातील जैव-रसायनशास्त्राचे प्राध्यापक कर्ट क्रॉस यांच्या मते, मंकीपॉक्स हा कोविडसारखा धोकादायक नाही. देशांनी मंकीपॉक्सच्या संकटावर लक्ष ठेवलं पाहिजे. हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरणार नाही याबाबतची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य संघटनेनं दिला आहे. प्रोफेसर कर्ट क्रॉस म्हणतात, की मंकीपॉक्स जवळजवळ चेचक किंवा चिकनपॉक्ससारखा आहे. मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. हे फार वेगाने पसरत नाही. जरी एखाद्या विशिष्ट भागातील लोकांना त्याचा संसर्ग झाला तरी ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगानं पसरत नाही.

कोविडमुळं होणाऱ्या मृत्यूंची तुलना मंकीपॉक्सशी केली, तर त्यामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण १ टक्के आहे. कोविडमुळं ६, ७ किंवा ८ टक्क्यांहून अधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, मंकीपॉक्स कोविडपेक्षा जास्त धोकादायक नाही. तथापि, आरोग्य तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला वेगळे ठेवावे, जेणेकरून संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल.

मंकीपॉक्सची लक्षणं कोणती?

युरोपीय प्रदेशातील यूएन हेल्थ एजन्सीचे संचालक डॉ. हंस क्लुगे यांच्या मते, या आजारात ताप, त्वचेवर पुरळ आणि सूज येणं अशी लक्षणं सहसा दिसतात. अनेक वेळा अंगात वेदना होतात आणि त्वचेवर फोड येतात. शरीरावर लाल ठिपके देखील येतात . बहुतेक प्रकरणांमध्ये, संक्रमित रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय बरे होतात.

कोणत्या रुग्णांसाठी मंकीपॉक्स जास्त धोकादायक आहे?

डॉक्टर हंस क्लुगे यांच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, संक्रमित व्यक्ती कोणत्याही उपचाराशिवाय काही आठवड्यांत बरे होतात. परंतु काळजी न घेतल्यास हा रोग अधिक गंभीर रुप धारण करु शकतो. हा आजार लहान मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक आहे.

Leave a comment