Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला आहे. “राहुल मुखर्जीच्या मोबाईल फोनवरील संभाषण आणि मेसेज हे सिद्ध करतात की शीना जिवंत आहे”, असे त्यांनी म्हटले. याआधीही इंद्राणी मुखर्जीने सीबीआय कोर्टात अर्ज दाखल करून शीना जिवंत असल्याचा दावा केला होता.
एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराच्या अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१५ मध्ये त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. शीना बोराच्या हत्येप्रकरणी सीबीआयने इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांना अटक केली होती. मार्च २०२० मध्ये पीटरला जामीन मिळाला.
२०२१ मध्येही हा दावा
इंद्राणी मुखर्जीने डिसेंबर २०२१ मध्ये सीबीआयला पत्र लिहून आपली मुलगी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. वैद्यकीय कारणास्तव इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हेही वाचा – ब्रेकिंग..! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार
एफआयआर आणि पोलिस रेकॉर्डवरील सुनावणीत शीनाच्या हत्येची तारीख २४ एप्रिल २०१२ आहे. तर मेसेजमध्ये राहुल आणि शीनाच्या संभाषणात शीनाला मिळालेल्या पगाराची तारीख सप्टेंबर २०१२ आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१२ दरम्यान राहुल आणि शीना यांना अनेक मेसेज पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. मार्च २०१३ मध्येही दोघांमधील संवादाचे तांत्रिक पुरावे समोर आले होते.