India Now World’s Fifth Largest Economy : भारतीय अर्थव्यवस्थेत सतत प्रगती होण्याचा परिणाम दिसून येत आहे. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीमुळं भारत अव्वल पाच देशांच्या अर्थव्यवस्थेत सामील झाला आहे. सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतानं ब्रिटनला मागे टाकले असून ब्रिटन आता सहाव्या स्थानावर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार, २०२१च्या शेवटच्या तिमाहीत भारतानं यूकेला मागे टाकले आहे. दुसरीकडे, IMFच्या GDP डेटानुसार, भारतानं पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केली आहे.
भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनपेक्षा कितीनं मोठी?
IMF द्वारे जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे आणि मार्च तिमाहीच्या अखेरीस डॉलरच्या विनिमय दराच्या आधारे, ब्लूमबर्गनं माहिती दिली आहे की नाममात्र रोखीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ८५४.७ अरब डॉलर्स होता. त्याच कालावधीत, त्याच आधारावर यूकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८१६ अरब डॉलर्स होता. आगामी काळात भारत ब्रिटिश अर्थव्यवस्थेविरुद्ध आपली धार मजबूत करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारत ही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे. दुसरीकडे, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता आहे. हे पाहता, भारत वार्षिक आधारावर डॉलरच्या मूल्यामध्ये यूकेला मागे टाकून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज IMFनं व्यक्त केला आहे.
हेही वाचा – मी पुन्हा देईन…पुन्हा देईन! मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का; राज्यपालांना दिलं पत्र!
भारताचा जीडीपी २० वर्षात दहा पटीनं वाढला
वार्षिक आधारावर, भारताची अर्थव्यवस्था ३.१७ लाख कोटी डॉलर्सची आहे. यूकेचा GDP सध्या ३.१९ लाख कोटी डॉलर्स आहे. ७ टक्क्यांच्या अंदाजे वाढीसह, भारत या वर्षीही वार्षिक आधारावर यूकेला मागे टाकण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर चीन, जपान आणि जर्मनी या देशांचा क्रमांक लागतो. भारताच्या जीडीपीनं गेल्या २० वर्षांत १० पट वाढ नोंदवली आहे.
Britain drops behind India to become the world's sixth largest economy
The former British colony jumped past the UK in the final three months of 2021 to become the fifth-biggest economy ⬇️ https://t.co/HT2xeFoIbr
— Bloomberg UK (@BloombergUK) September 2, 2022
अवघ्या १० वर्षात भारतानं ११व्या स्थानावरून पाचव्या स्थानापर्यंतचा प्रवास केला आहे. हे सर्व बाबतीत आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद आहे. आता भारताच्या पुढे फक्त अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी उरले आहेत. ब्रिटनसाठी हा मोठा धक्का आहे. ७५ वर्षांपूर्वी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटीशांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की भारत आघाडीच्या अर्थव्यवस्थेत स्थान निर्माण करेल. आज जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था डबघाईला येत आहेत. अशावेळी भारत विकासाच्या वाटेवर स्वार होत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
हेही वाचा – INS विक्रांत देशसेवेत दाखल..! पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांना…”
भारतात गेल्या काही वर्षांत सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत. या सुधारणा प्रत्येक क्षेत्रात झाल्या आहेत. मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया असे अनेक उपक्रम भारतानं राबवले आहेत. त्यांचा विकासावर सकारात्मक परिणाम झाला आहे. कोरोनाच्या काळातही सरकारचा भर आर्थिक विकासाला चालना देण्यावर होता. सरकारच्या या धोरणांचा फायदा झाला आहे.
सर्वसामान्यांना फायदा काय?
पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होणं ही प्रत्येक भारतीयासाठी सर्वप्रथम अभिमानाची बाब आहे आणि यामुळे जगभरातील भारतीयांचे स्थान अधिक मजबूत होईल, मग निर्यातीच्या संधी असोत किंवा पासपोर्टचे सामर्थ्य. कारण मजबूत अर्थव्यवस्थेसह प्रत्येकाला नातं मजबूत ठेवायचं असतं. आता भारतावरील परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढेल. किंबहुना, गुंतवणुकदारांना असं सूचित करण्यात आलं आहे की भारतानं कठीण काळातही वाढ कायम ठेवली आहे, अशा परिस्थितीत जगभरातील रिकव्हरीमुळं भारताची वाढ अधिक मजबूत होईल. जी गुंतवणुकीच्या दृष्टीनं अतिशय आकर्षक गोष्ट आहे. सरकार आक्रमकपणे मेक इन इंडिया आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह सारख्या योजना गुंतवणूकदारांसमोर ठेवत असताना, टॉप ५ मध्ये येण्यामुळं भारत हा गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक बाजारपेठ असल्याचा भारत सरकारचा दावा अधिक बळकट होईल.
सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार चीनचा पर्याय शोधत आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी नवं मानांकनही मोठं चिन्ह असेल. जर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवली आणि एफडीआय वाढला, तर देशात रोजगाराच्या संधी तर वाढतीलच शिवाय लोकांचं उत्पन्नही वाढेल आणि काम सुरू करणाऱ्यांनाही संधी मिळेल. म्हणजेच भारतातील टॉप ५ मध्ये सामील झाल्यामुळं सर्वसामान्य भारतीयांसाठी नवीन संधी मिळू शकतात हे स्पष्ट आहे.