राष्ट्रपतींची रॉयल ‘बग्गी’ मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये टॉस झाला होता! जाणून घ्या रंजक इतिहास..

WhatsApp Group

मुंबई : २०२२च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला. त्या देशाच्या १५व्या राष्ट्रपती असतील. हा विजय भारतासाठीही महत्त्वाचा आहे, कारण द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. २५ जुलै रोजी त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. यादरम्यान त्या रॉयल बग्गीत बसून शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जाऊ शकतात. या बग्गीचा इतिहास खूप जुना आहे.

फाळणीशी जोडला आहे बग्गीचा इतिहास

१९४७मध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली होती. मग जमीन आणि सैन्यापासून प्रत्येक वस्तूच्या वाटणीबाबत दोन्ही देशांमध्ये नियम ठरवले जाणार होते. यामध्ये भारताचे प्रतिनिधी एचएम पटेल होते आणि पाकिस्तानचे चौधरी मोहम्मद अली यांना त्यांच्या देशाची बाजू ठेऊन ही फाळणी सोपी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. दोन देशांमधील फाळणीदरम्यान गव्हर्नर जनरलचे अंगरक्षक, ज्यांना आता राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून ओळखले जाते ते भारत आणि पाकिस्तानमध्ये २:१ च्या प्रमाणात विभागले गेले. जेव्हा व्हाईसरॉयच्या गाडीची पाळी आली तेव्हा दोन्ही देशांनी त्यावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली.

नाणेफेकीनंतर बग्गी भारताच्या वाट्याला आली

‘राज्यापालांचा अंगरक्षक कमांडर आणि त्याच्या साथीदाराने वाद मिटवण्यासाठी नाणेफेकीचा पर्याय सूचवला. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांमध्ये रेजिमेंटचे पहिले कमांडर लेफ्टनंट कर्नल ठाकूर गोविंद सिंग आणि पाकिस्तान लष्कराचे साहबजादा याकूब खान यांच्यात टॉस झाला. यामध्ये भारतानं नाणेफेक जिंकली आणि ही बग्गी भारताच्या वाट्याला आली.

बग्गीची खासियत काय आहे?

बग्गीच्या वरच्या भागावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. ही बग्गी ब्रिटिश राजवटीत व्हाईसरॉयला सापडली होती. या बग्गीमध्ये तो फिरायचा. मात्र, स्वातंत्र्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींनीही विशेष प्रसंगी या बग्गीचा वापर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात भारताचे राष्ट्रपती या बग्गीमध्ये सगळ्या समारंभांना जात असत आणि ३३० एकरांवर पसरलेल्या राष्ट्रपती भवनातही ते या बग्गीमधून फिरत असत. १९५०मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र डॉ. प्रसाद यांनी पहिल्यांदा या बग्गीचा वापर केला होता. तेव्हापासून त्याचा ट्रेंड सुरू झाला. ही बग्गी ओढण्यासाठी खास घोडे निवडले जातात. त्यावेळी ६ ऑस्ट्रेलियन घोडे ही बग्गी खेचत असत, पण आता बग्गी खेचण्यासाठी फक्त चार घोडे वापरले जातात.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर…

१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ही बग्गी हटवण्यात आली होती. त्याची जागा बुलेटप्रूफ कारने घेतली. सुमारे ३० वर्षे या बग्गीचा वापर बंद होता. ही बग्गी राष्ट्रपती भवनात ठेवण्यात आली असून तिचे चांगली काळजी घेण्यात येत आहे.

प्रणव मुखर्जींनी सुरू केला ट्रेंड..

२०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा बग्गीचा वापर केला. बीटिंग रिट्रीट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते या बग्गीतून आले होते. २५ जुलै २०१७ रोजी शपथ ग्रहण सोहळ्यात एका आलिशान कारऐवजी, रामनाथ कोविंद या बग्गीतून संसदेत आले होते. त्यावेळी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बग्गीमध्ये डावीकडे तर नवे राष्ट्रपती कोविंद उजव्या बाजूला बसले होते. कोविंद यांनी शपथ घेतल्यानंतर बग्गीमध्ये दोघांची जागा बदलली आणि परत येताना प्रणव उजवीकडे तर कोविंद डावीकडे बसले होते. प्रणव मुखर्जी यांच्याआधी २००२ ते २००७ या काळात देशाचे ११ वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम देखील राष्ट्रपती भवनात फिरण्यासाठी अधूनमधून या बग्गीचा वापर करत होते.

Leave a comment