काय डोकं लावलंय..! मैदानासाठी भाड्याचं शेत, खेळाडू म्हणून मजूर आणि..; ‘असं’ होतं गुजरातचं ‘फेक’ आयपीएल!

WhatsApp Group

मुंबई : क्रिकेट हा बहुकेत भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. सर्वात जास्त पब्लिक एखाद्या क्रिकेट मॅचसाठी आपल्या देशात एकत्र येतात. आता तर आयपीएल, वर्ल्डकप, इंटरनॅशनल मॅचेस यामुळं संपूर्ण वर्षभराचं शेड्युल पॅक असतं. पैसा भरपूर मिळत असल्यानं हा खेळ आता ब्रँड झाला आहे. पण कधीकधी अशा घटना उघडकीस येतात, ज्याच्यामुळं या खेळाला कलंक म्हटलं जातं. असाच एक प्रकार गुजरातमध्ये घडला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आयपीएलसारख्या क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टेबाजीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण, आता गुजरातमध्ये अशी फसवणूक उघडकीस आली आहे, जिथं फेक आयपीएल सुरू होतं. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात वडनगरमध्ये या बनावट आयपीएलमध्ये रशियातील काहीजण बेटिंगच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी याचा खुलासा करत चार जणांना अटक केली.

भाड्याचं शेत आणि खेळाडू म्हणून मजूर!

ही बनावट क्रिकेट लीग आयोजित करण्यासाठी शेत भाड्यानं घेण्यात आलं होतं आणि मजुरांना खेळण्यासाठी प्रति सामना ४०० रुपये देण्यात आले होते. सामन्यादरम्यान मजुरांना जर्सी घालून मैदानात उतरवलं जात होतं आणि बनावट पंचही ठेवण्यात आले होते, जे संपूर्ण सामन्याचं अंपायरिंग करत होते. सामन्यादरम्यान मागून ऑडिओ इफेक्टही देण्यात आले होते. एकंदरीत खरी आयपीएल चालू आहे, असं लोकांना वाटावं असा हा प्रयत्न होता. सगळ्यात भारी म्हणजे प्रेक्षकांचा आवाज होता, पण मैदानात प्रेक्षकच नव्हते.

पोलिसांनी काय सांगितलं?

या बनावट आयपीएल सामन्याचं चित्रीकरण करण्यासाठी एचडी कॅमेरे बसवण्यात आले होते आणि सामन्यांचं यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केलं जात होतं. यासाठी सेंच्युरी हीटर नावाच्या टीमची नोंदणी CRICHEROES या अॅपवर करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, शोएब दावडा नावाच्या व्यक्तीनं सट्टेबाजीसाठी संपूर्ण मैदान तयार केलं होतं आणि २०-२० षटकांचा सामना खेळवला जात होता. सामना खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना कसं खेळायचं, कधी आऊट व्हायचं आणि कधी रन करायचं याच्या आधीच सूचना देण्यात आल्या होत्या.

गुजरातमधील या बनावट आयपीएलचं कनेक्शन रशियाशी संबंधित असून ठगांनी टव्हेर, वोरोनिश आणि मॉस्को या तीन रशियन शहरातील लोकांना आपल्या जाळ्यात पकडल्याची माहिती मिळाली आहे. मेहसाणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केलं असून आतापर्यंत घटनास्थळावरून ३ लाख रुपयांसह ४ जणांना अटक केली आहे. या बेटिंगमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय रॅकेटचं नाव असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

भारतात कायद्यानुसार घोड्यांच्या शर्यतीशिवाय कुठल्याही खेळावर सट्टा लावता येत नाही, पण क्रिकेटवर अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात सट्टा लागतो.

Leave a comment