मोदी सरकारकडून ऐतिहासिक ‘राजपथ’चं बारसं..! इंग्रजांच्या सावलीतून बाहेर पडतोय भारत

WhatsApp Group

Rajpath as Kartavya Path : दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथचं नामकरण होणार आहे. राजपथ आता ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाईल. ऐतिहासिक राजपथ आणि राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट असे सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली नगर परिषदेनं (NDMC) राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचं ‘कर्तव्यपथ’ असं नामकरण करण्यासंदर्भात ७ सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली आहे. याबाबतचा प्रस्ताव परिषदेसमोर ठेवण्यात येणार आहे. इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रोड आणि परिसर ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाईल.

पंतप्रधान मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात वसाहतवादी विचारसरणी दर्शविणारी चिन्हं काढून टाकण्याची गरज व्यक्त केली होती. स्वातंत्र्यानंतर प्रिन्स एडवर्ड रोडचं विजय चौक, क्वीन व्हिक्टोरिया रोडचं डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, ‘किंग जॉर्ज अव्हेन्यू’ रोडचं राजाजी मार्ग असं नामकरण करण्यात आलं. या महत्त्वाच्या रस्त्यांना ब्रिटीश सम्राटांचं नाव देण्यात आलं होतं. शिवाय विविध शासकांप रस्त्यांची नावं होती. फिरोज शाह रोड, पृथ्वीराज रोड, लोदी रोड, औरंगजेब रोड, अकबर रोड इ. मोदी सरकारच्या काळात अनेक रस्त्यांचं नामांतर करण्यात आलं. २०१५ मध्ये रेसकोर्स रोडचें नाव बदलून पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्ग असं करण्यात आलं. २०१५ मध्ये औरंगजेब रोडचं नामकरण एपीजे अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं. २०१७ मध्ये डलहौसी रोडचं नाव दाराशिकोह रोड असं करण्यात आलं. अशा प्रकारे, देश आता निवडकपणे इंग्रजांच्या सावलीतून बाहेर पडत असल्याचं दिसतं.

हेही वाचा – VIDEO : फक्त १००० रुपयांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांचं ‘गर्भवती’ महिलेसोबत संतापजनक कृत्य!

हेही वाचा – ऐकलं का…गाडीत पुढं बसा किंवा पाठी बसा, सीट बेल्ट नसेल तर ‘इतका’ दंड लागणार!

राजपथचा इतिहास

इंग्रजांच्या काळात राजपथला किंग्सवे म्हटलं जायचं. १९११ मध्ये किंग जॉर्ज पंचम दिल्ली दरबारला उपस्थित राहण्यासाठी इथं आला होता. या दरम्यान कोलकाता ऐवजी दिल्ली ही भारताची राजधानी (ब्रिटिश राजवट) करण्याची घोषणा करण्यात आली. म्हणूनच किंग जॉर्ज पंचम याच्या सन्मानार्थ ब्रिटिशांनी या ठिकाणाला किंग्सवे असं नाव दिलं. किंग्सवे म्हणून, ते ब्रिटिश साम्राज्याच्या शाही ओळखीचे प्रतीक होतं. स्वातंत्र्यानंतर त्याचं १९५५ मध्ये राजपथ असं नामकरण करण्यात आलं. किंग्सवे प्रमाणे, हा मिरवणूक मार्ग साम्राज्यवादी राजवटीबद्दल भीतीची भावना निर्माण करण्यासाठी बांधला गेला होता. रायसीना हिलवरून या वाटेचा उतार पुराण किल्ल्याकडं निर्देशित करतो. नंतर त्याच्या मध्यभागी नॅशनल स्टेडियम बांधण्यात आलं. हे सामर्थ्य प्रतीकात्मक अक्ष म्हणून डिझाइन केलं होतं. त्याच्या दोन्ही बाजूंना बागा होत्या. तसेच इथं कारंज्यांची मालिका होती.

राजपथ हा उच्चभ्रू वर्गाचा रस्ता म्हणून पाहिला जात होता. आता तो सर्वसामान्यांसाठी रस्ता बनला आहे. राजपथावरून स्वातंत्र्यानंतर अनेक आंदोलनांचा जन्म देशानं पाहिला आहे. १९८८ मध्ये इथून शेतकऱ्यांचा मोठा विरोध झाला होता. २०१२ मध्ये निर्भयाच्या मृत्यूनंतर इथं निदर्शनंही झाली. ऐतिहासिक राजपथ २०१९ मध्ये CAA विरोधात झालेल्या निदर्शनांचा साक्षीदार आहे. याशिवाय या ऐतिहासिक राजपथावर दरवर्षी देशाची लष्करी ताकद आणि सांस्कृतिक विविधता पाहायला मिळते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment