Adani Group : गौतम अदानी आपला बिझनेस वाढवण्यासाठी नवीन योजना बनवत आहेत. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस पाणी शुद्ध करण्याचे आणि वितरणाचे काम करणार आहे. कंपनी या क्षेत्रात आपला व्यवसाय वाढविण्याचा विचार करत आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कंपनीचे मत आहे.
यासह, कंपनी पुढील आठवड्यात FPO आणत आहे. या एफपीओची किंमत सुमारे २०,००० कोटी रुपये असेल. अदानीचा FPO २७ जानेवारीला उघडेल आणि ३१ जानेवारीला बंद होईल. FPO अंतर्गत, कंपनीने ३११२ रुपये ते ३२७६ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर ३५९५.३५ रुपयांवर बंद झाले.
कोल इंडिया नंतर दुसरा सर्वात मोठा FPO
अदानी समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग मीडिया यांनी सांगितले की, जर कंपनीचा FPO पूर्णपणे सबस्क्राइब झाला तर कोल इंडियाच्या २२,५५८ कोटी रुपयांच्या इश्यूनंतर हा देशातील दुसरा सर्वात मोठा FPO असेल. कोल इंडियाचा IPO १५१९९ कोटी रुपयांना आला होता.
हेही वाचा – SBI च्या ग्राहकांना धक्का..! बँकेंने बदलला ‘हा’ नियम; अकाऊंटमधून कापले जाणार पैसे!
निधी कुठे वापरणार?
FPO मधून उभारलेल्या २०,००० कोटींपैकी १०,८६९ कोटी रुपये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, विद्यमान विमानतळांचा विकास आणि नवीन एक्सप्रेसवे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय ४१६५ कोटी रुपये विमानतळ, रस्ते आणि सौर प्रकल्पांच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील.
कंपनीवर किती कर्ज?
कंपनी ग्रीन हायड्रोजन, विमान वाहतूक क्षेत्र आणि डेटा केंद्रांसह नवीन संधींचा लाभ घेत आहे. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीचे कर्ज ४०,०२३.५० कोटी रुपये होते. जुगशिंदर सिंग म्हणाले की, आम्ही सध्या व्याप्ती आणि संधींचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही या क्षेत्रासाठी (पाणी) खूप उत्सुक आहोत कारण कोणत्याही पायाभूत सुविधांसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे.