Team India Chief Selector : टीम इंडियाचा पुढील चीफ सिलेक्टर कोण असेल? बीसीसीआयने टी-२० विश्वचषकानंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती हटवल्यापासून हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. नवीन निवड समितीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर रोजी संपत असताना, काही मोठी नावे समोर आली आहेत जी चीफ सिलेक्टर होण्याच्या शर्यतीत आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, माजी डावखुरा फिरकीपटू मनिंदर सिंग, भारतासाठी २० हून अधिक कसोटी खेळण्याचा अनुभव असलेले सलामीवीर शिव सुंदर दास यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ निवड समितीच्या पदासाठी अर्ज केला आहे. माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही हे निश्चित होऊ शकले नाही. आगरकरने अर्ज केल्यास त्याचे निवड समितीचे अध्यक्षपद निश्चित असल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या वरिष्ठ संघ निवड समितीचे विद्यमान प्रमुख सलील अंकोला, माजी यष्टीरक्षक समीर दिघे आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी मुंबईतून अर्ज केला आहे.
हेही वाचा – Onion Prices : कांद्याचा दर ऐकून शेतकरी वर्ग रडकुंडीला..! महाराष्ट्रात मिळतोय ‘असा’ भाव
नव्या निवड समितीसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ५० हून अधिक लोकांनी अर्ज केल्याचे समजते. यातील सर्वाधिक कसोटी मनिंदर सिंग (३५ कसोटी) आणि दास (२१ कसोटी) यांनी खेळल्या आहेत. मनिंदर यांनी २०२१ मध्येही अर्ज केला आणि मुलाखत फेरीत पात्र असूनही त्याची निवड झाली नाही. उत्तर विभागातून मनिंदर, अतुल वासन, निखिल चोप्रा, अजय रात्रा आणि रितींदर सिंग सोधी यांनी अर्ज केले आहेत. दास, प्रभंजन मलिक, रश्मी रंजन परिदा, शुभमोय दास आणि सौरशीष लाहिरी यांनी पूर्व विभागातून अर्ज केले आहेत. मध्य प्रदेशाबद्दल बोलायचे झाले तर अमय खुरासिया आणि ज्ञानेंद्र पांडे यांनी येथून अर्ज केले आहेत.
चीफ सिलेक्टर होण्यासाठी काय आवश्यक आहे?
- ७ किंवा अधिक कसोटी सामने खेळलेला कोणताही खेळाडू.
- ३० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.
- १० एकदिवसीय सामने किंवा २० लिस्ट-ए सामने खेळलेले असावेत.
- ५ वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती.
- बीसीसीआयच्या कोणत्याही समितीचा सदस्य नसावा आणि पुढील ५ वर्षे सेवा करू शकेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!