Gujarat Fake Notes : गुजरातच्या सुरत पोलिसांनी एका रुग्णवाहिकेतून प्रत्येकी २००० रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले बॉक्स जप्त केले आहेत. साधारणपणे आजारी किंवा गरजू लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर केला जातो, मात्र सुरतमध्ये बनावट नोटा इकडून तिकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर केला जात होता. बॉक्समधून २५ कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी ”रिव्हर्स बँक ऑफ इंडिया आणि फक्त सिनेमाच्या शूटिंगसाठी” असे लिहिलेले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत शहरातील लिंबायत भागात एका जाहीर सभा घेतली आणि संध्याकाळी सुरत जिल्ह्यातील कामरेज भागातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडल्या.
दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्याची बातमी पसरताच सर्वजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की, संपूर्ण प्रकरण काय आहे? अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेत बनावट नोटांचा मोठा साठा असल्याची माहिती सुरत ग्रामीण पोलिसांच्या कामरेज पोलीस ठाण्याला मिळाली होती. याची माहिती मिळताच कामरेज पोलीस ठाण्याने महामार्गावर रुग्णवाहिका पकडण्यासाठी सापळा रचला होता.
हेही वाचा – रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काय केलं बघा..! Video होतोय व्हायरल
महामार्गावर असलेल्या शिवशक्ती हॉटेलजवळ कामरेज पोलीस ठाण्याच्या पथकाने रुग्णवाहिका अडवली होती. मूळचा जामनगर येथील हितेश पुरुषोत्तम कोटडिया या रुग्णवाहिकेचा चालक असून त्याने रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा उघडून तपासणी केली असता आतमध्ये ६ बॉक्स आढळून आले, त्यात दोन हजार रुपयांचे १२९० बंडल आढळून आले, ही रक्कम २५ कोटी ८० लाख इतकी आहे.
Surat, Gujarat |On basis of inputs received by Kamrej police, an ambulance was intercepted on Ahmedabad-Mumbai road. On questioning driver & checking vehicle, 6 cartons containing 1290 packets of Rs 2000 counterfeit notes worth Rs 25.80 crores, was found: Hitesh Joysar, SP Rural pic.twitter.com/wWiItpmQpa
— ANI (@ANI) September 29, 2022
ज्या रुग्णवाहिकेतून ही चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे त्यावर दिकरी एज्युकेशन ट्रस्ट मोटा वडाळा सुरत असे लिहिले आहे. यासोबतच गौ माता राष्ट्रमाता असेही लिहिले आहे. या रुग्णवाहिकेतून बनावट नोटांचे बंडल मिळाल्याची माहिती मिळताच सूरत ग्रामीणचे एसपी हितेश जोयसर यांनी स्वत: कामरेज पोलीस ठाणे गाठले. एसपी हितेश जोयसर यांनी प्रथम रुग्णवाहिका पाहिली, ज्यातून दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले.