मुंबई : पावसाळा म्हटलं की चांगलं वातावरण असतं, पण आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानं समो येतात. जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गासोबतच अनेक प्रकारच्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचाही धोका असतो. डेंग्यू हा असाच एक गंभीर आजार असून त्यामुळं दरवर्षी रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. डेंग्यू आजार जीवघेणा आहे, म्हणूनच आरोग्य तज्ञ सर्वांना या आजारापासून बचाव करण्यासाठी उपाय करत राहण्याचा सल्ला देतात. डेंग्यू हा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यामध्ये ताप येणं, प्लेटलेट्स वारंवार कमी होणं अशा समस्या उद्भवतात. कधीकधी ही गंभीर लक्षणं जीवघेणी ठरू शकतात.
डेंग्यूचा विषाणू प्रामुख्यानं एडिस इजिप्ती प्रजातीच्या मादी डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यूची लक्षणं साधारणपणे २-७ दिवस टिकतात, बहुतेक लोक एका आठवड्यानंतर बरे होतात. पण, ज्यांना तापामुळं प्लेटलेट्स घसरण्याची समस्या आहे, त्यांना विशेष उपचारांची आवश्यकता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांना डेंग्यूचा धोका जास्त आहे आणि ते टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
डेंग्यूची लक्षणं कोणती?
डेंग्यूच्या लक्षणांकडं वेळीच लक्ष दिल्यास या आजाराला गंभीर स्वरूप येण्यापासून रोखता येतं. डेंग्यूची लक्षणं सुरुवातीला फ्लूसारखीच असू शकतात, त्यामुळं त्यांच्यात फरक करणं आवश्यक आहे. संक्रमित डास चावल्यानंतर चा४र ते १० दिवसांनी लक्षणं दिसू शकतात. यामध्ये सर्वाधिक तापाची समस्या दिसून येते. ताप १०४ फॅरेनहाइटच्या जवळ असू शकतो. डेंग्यूच्या तापासोबत डोकेदुखी, स्नायू, हाडं किंवा सांधेदुखी, मळमळ, उलट्या, डोळ्यांमागील वेदना आणि त्वचेला लालसरपणा येऊ शकतो.
कोणाला होऊ शकतो डेंग्यू?
जर तुम्ही डेंग्यूचं प्रमाण जास्त असलेल्या भागात राहत असाल किंवा डेंग्यूची लागण झालेल्या ठिकाणी प्रवास केला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. याशिवाय, तुम्हाला यापूर्वी डेंग्यू ताप आला असला तरीही, तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका अधिक असू शकतो. जर तुम्हाला याआधी डेंग्यूची लागण झाली असेल, तर तुम्हाला पुढील संसर्गामध्ये गंभीर लक्षणांचा धोका वाढतो.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये इतर लोकांपेक्षा डेंग्यूची गंभीर लक्षणं विकसित होण्याचा धोका जास्त असतो. अशा लोकांमध्ये प्लेटलेट्स झपाट्यानं कमी होऊ लागतात आणि त्यांना बरं होण्यासाठी इतर लोकांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांनी डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.
डेंग्यू टाळण्यासाठी काय करावं?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. घराभोवती डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी, रिकाम्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका आणि रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा. डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपाययोजना करणंही आवश्यक आहे.