14 वर्षात कुटुंबातील 6 सदस्यांना संपवलं, कोण होती जॉली जोसेफ?

WhatsApp Group

‘करी अँड सायनाइड’ नावाची क्राइम थ्रिलर डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर (Curry & Cyanide : The Jolly Joseph Case In Marathi) रिलिज करण्यात आली आहे. केरळच्या कोझिकोड येथील जॉली जोसेफ प्रकरणावर आधारित ही डॉक्युमेंटरी आहे. जॉली जोसेफ प्रकरण काय होते, ही घटना ऐकल्यावर लोक का घाबरतात, याची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. 2019 मध्ये जॉली जोसेफ नावाच्या महिलेला एसआयटी टीमने केरळमधील कोझिकोडमध्ये अटक केली होती. या महिलेवर 6 जणांच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात जॉलीवर 2002 ते 2016 या कालावधीत त्याच्याच कुटुंबातील सहा सदस्यांची गूढ हत्या केल्याचा आरोप आहे. या लोकांमध्ये जॉली जोसेफचे सासू, सासरे, पती आणि एक महिला आणि तिची 2 वर्षांची मुलगी यांचा समावेश होता. सायनाइड या घातक विषाच्या साहाय्याने हत्या करण्यात आली होती.

केरळमधील कोझिकोडमधील पोन्नमट्टम परिसरात थॉमस कुटुंब राहत होते. या कुटुंबाची गणना परिसरातील समृद्ध कुटुंबांमध्ये होत होती. कुटुंबाचे प्रमुख टॉम थॉमस होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनम्मा थॉमस होते. या जोडप्याला दोन मुलगे होते. रॉय थॉमस आणि रोजो थॉमस. 1997 मध्ये रॉयचा विवाह जॉली अम्मा जोसेफ नामक महिलेशी झाला. लग्नानंतर जॉली अल्पावधीतच सर्वांची लाडकी झाली. तिने कुटुंबाची चांगली काळजी घेतली.

रॉय आणि जॉली

रॉयशी लग्न झालं, तेव्हा जॉली चांगली शिकलेली असल्याचे थॉमस कुटुंबीयांना तिच्याकडील सर्टिफिकेट्सवरून वाटले. जॉलीची सासू तिला चांगले शिक्षण घेतल्याने नोकरी कर असा सल्ला वारंवार देत होती. लग्नानंतर काही जॉलीने आपल्या घरच्यांना सांगितले, की तिला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), कालिकत येथे नोकरी मिळाली आहे. महिना 40 हजार पगाराची नोकरी असल्याचे जॉलीने घरच्यांना सांगितले. तशी ती नोकरी म्हणून रोज घराबाहेरची जायची. तिच्याकडे NIT चे आयकार्डही होते. सगळे काही सुरू असताना 2002 मध्ये जॉलीची सासू अनम्मा यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. 22 ऑगस्ट 2002 रोजी घरी येऊन फक्त दोन महिने उलटले होते, तेव्हा अनम्मा यांची तब्येत पुन्हा बिघडली. पंरतु यावेळी अनम्मा यांचे निधन झाले.

वयोमानानुसार अनम्मा यांना तब्येतीच्या काहीनाकाही कुरबुरी होत्या. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही मृत्यूचे खरे कारण समजण्यासाठी डॉक्टरांनी कुटुंबीयांना पोस्टमार्टम करण्याचा सल्ला दिला. मात्र कुटुंबीयांनी तसे करण्यास नकार दिला. हा नैसर्गिक मृत्यू समजून त्यांनी अनम्मा यांच्यावर अंत्यसंस्कार केले. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीय अतिशय दु:खी झाले. पण वेळ निघून गेली आणि कुटुंबाचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. घरात सासूची सर्व जबाबदारी जॉलीने आपल्या खांद्यावर घेतली. 26 ऑगस्ट 2008 रोजी टॉम थॉमस यांचाही अचानक मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात त्यांच्या मृत्यूचे कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. यावेळीही कुटुंबीयांनी टॉमचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू मानून शवविच्छेदन न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 6 वर्षांत कुटुंबातील दोन मृत्यूनंतर परिस्थिती बदलू लागली. पूर्वी संयुक्त कुटुंब होते. पण आता त्यांच्यात संपत्तीची वाटणी होऊ लागली. आता सगळे वेगळे राहू लागले.

तीन वर्षांनंतर आणखी एक मृत्यू

मग तो दिवस आला 9 सप्टेंबर 2011. जॉलीचा नवरा रॉय थॉमसचे अचानक निधन झाले. रॉयचा मृतदेह बाथरूममधून सापडला. यावेळी या कुटुंबीयांच्या जवळच्या मॅथ्यू मंजाडियाल नामक व्यक्तीला संशय आला. त्यांच्या विनंतीवरून रॉय यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायनाइडच्या विषामुळे रॉय यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास वाढवला असता रॉय आर्थिक संकटाशी झुंजत असल्याचे समोर आले. याच कारणावरून आपल्या पतीने आत्महत्या केली, हे जॉलीने स्वतः पोलिसांना सांगितले होते. रॉय प्रत्यक्षात आर्थिक संकटाशी झुंजत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी जॉलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

वेळ निघून गेली. मग तो दिवस आला, 24 फेब्रुवारी 2014. मॅथ्यू मंजाडियाल यांचाही असाच मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी त्यांचे शवविच्छेदन न करता त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले. कुटुंबात एकामागून एक मृत्यू होत होते. पण कोणालाच काही कळत नव्हते. आजूबाजूचे लोक असेही म्हणू लागले की या कुटुंबाला कोणता तरी वाईट आत्मा आहे किंवा कोणीतरी त्यांना शाप दिला आहे.

मॅथ्यू यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आणखी एक मृत्यू झाला. यावेळी रॉय थॉमसचा चुलत भाऊ शाजू थॉमस यांची मुलगी अल्फिन हिचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी अल्फिन फक्त दोन वर्षांची होती. हा मृत्यूही अचानक झाला. यानंतर 11 जानेवारी 2016 रोजी अल्फिनची आई सिली साखरियास हिचेही निधन झाले. म्हणजेच 14 वर्षात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला होता. एवढेच नाही तर एकाच कुटुंबातील दोन दूरच्या नातेवाईकांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला. सिली यांच्या मृत्यूनंतर जॉली आणि शाजूचे लग्न झाले. त्यानंतर ती त्याच्यासोबत राहू लागली.

त्यानंतर टॉमचा धाकटा मुलगा रोजो थॉमस आणि मुलीला संशय आला. सहा मृत्यू हा केवळ योगायोग नसून कोणीतरी सुनियोजित कट रचला गेल्याचा या दोघांना संशय होता. रोजो अमेरिकेत नोकरी करत असे. मात्र या सर्व मृत्यूमागे आपल्या मेहुणीचा म्हणजेच जॉलीचा हात असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे या 6 मृत्यूंचा तपास करण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली. सुरुवातीला पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र दुसरीकडे रोजोही या प्रकरणाचा आपल्या स्तरावरून तपास करत होता.

जॉली NIT कालिकतमध्ये काम करते, हे खोटे असल्याचे पोलिसांना कळले. जॉलीचे आयकार्ड, सर्व सर्टिफिकेट्सही बनावट निघाले. एवढेच नाही तर मृत्यू झालेल्या सहा जणांच्या आसपास फक्त जॉलीच उपस्थित असल्याचे रोजोने पोलिसांना सांगितले. रोजोचे म्हणणे गांभीर्याने घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्वात आधी थडग्यातून सहा मृतदेह बाहेर काढून त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यामध्ये 5 मृत्यू सायनाइडमुळे तर 2 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे आढळून आले.

हेही वाचा – मुंबई, नवी मुंबईनंतर आता ‘तिसरी मुंबई’, काय खास असेल? वाचा!

5 ऑक्टोबर 2019 रोजी पोलिसांनी जॉलीला पुन्हा अटक केली. आधी जॉली त्यांची दिशाभूल करत राहिली. मात्र कडक चौकशीत जॉलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. घरचा सर्व हिशोब आपल्या हातात यावा, यासाठी जॉलीने सासूची हत्या केली. रॉय आणि आपल्याला पैशाची गरज असताना सासऱ्यांनी जमिनीचा तुकडा विकून पैसे दिले. ही गोष्ट जॉलीला आवडली नाही. त्यामुळे सासऱ्यांनाही तिने दूर केले. पती दारूच्या नशेत राहत असल्याने जॉलीचे त्यांच्याशी मतभेद होऊ लागले. त्यामुळे जॉलीने रॉयलाही संपवले. यादरम्यान, जॉलीला तिच्या पतीचा चुलत भाऊ म्हणजेच शाजू थॉमस आवडायला लागला. पण त्याचे आधीच लग्न झाले होते. आणि जॉलीला त्याला कोणत्याही किंमतीत मिळवायचे होते. त्यामुळे त्याने शाजूची पत्नी आणि मुलीची हत्या केली. त्याच वेळी, त्याने मॅथ्यू यांची हत्या केली कारण रॉयच्या मृत्यूनंतर मॅथ्यू पोस्टमॉर्टम करण्याचा आग्रह धरत होते. त्यानंतर पोलिसांनी रॉयचा चुलत भाऊ शाजू यालाही अटक केली. मात्र पोलिसांना शाजूविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. या सहा हत्यांमागे केवळ जॉलीचा हात असल्याचे पोलिसांनी मान्य केले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता जॉलीला त्याच्या एका नातेवाईकाने सायनाइड पुरवले होते. या सदस्याचा एक मित्र दागिन्यांच्या दुकानात काम करायचा तेथे सायनाइडचा वापर सोने आणि चांदी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी 1800 पानांचे आरोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले. या खुलाशानंतर जॉली देशात सायनाइड जॉली या नावाने प्रसिद्ध झाली. सध्या जॉली तुरुंगात आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये, CFSL हैदराबादचा फॉरेन्सिक अहवाल देखील या प्रकरणात आला होता. असा दावा करण्यात आला होता, की 6 मृतदेहांपैकी 4 मृतदेहांमध्ये सायनाइडचे कोणतेही अंश सापडले नाहीत. पण केरळ उच्च न्यायालयाने सांगितले की, मृत्यूच्या इतक्या वर्षानंतरही सायनाइडचे अंश शरीरात राहिले नसण्याची शक्यता आहे. मात्र जॉलीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment