अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

WhatsApp Group

मुंबई : अनुभवी चित्रपट अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनऊच्या खासदार आमदार न्यायालयानं २६ वर्ष जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाचटी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी राज बब्बर यांना ८५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी बब्बर यांच्यावर मतदान अधिकाऱ्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे.

मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणं, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लखनऊच्या खासदार आमदार न्यायालयात दोषी ठरविताना राज बब्बर स्वतः कोर्टात हजर होते. २६ वर्षे जुन्या खटल्यात न्यायालयाचा आदेश दिल्यानंतर बब्बर यांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं सांगितलं. मात्र, या प्रकरणात न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीनही मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण २ मे १९९६ मधील आहे. यावेळी राज बब्बर समाजवादी पक्षाच्या वतीनं निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. वजीरगंजमधील एका मतदान अधिकाऱ्यानं बब्बर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी बब्बर आणि अज्ञात लोकांविरुद्ध लखनऊच्या वजीरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी बूथमध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याचे मतदान अधिकाऱ्यानं सांगितलं होतं.

मतदान अधिकारी श्रीकृष्णसिंह राणा यांच्या फिर्यादीत अशी नोंद आहे, की २ मे १९९६ रोजी त्यांची ड्युटी मतदान केंद्र क्रमांक १९२/१०३ या बुथ क्रमांकावर होती. जेव्हा लोक मतदान करण्यासाठी बूथ क्रमांक १९२ पर्यंत पोहोचले नाहीत तेव्हा ते उठले आणि जेवायला बाहेर जाऊ लागले. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून राज बब्बर यांनी त्यांच्या समर्थकांसह मतदान केंद्रात प्रवेश करून बोगस मतदान झाल्याचा आरोप केला, असे श्रीकृष्ण सिंह राणा यांनी सांगितलं होतं.

वजीरगंज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत असंही म्हटलंय, की बब्बर यांच्या आरोपांना मतदान अधिकाऱ्यानं आक्षेप घेतल्यावर ते भडकले. यानंतर बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना मारहाण केली, ज्यात अनेक अधिकारी जखमीही झाले.

Leave a comment