१६ वर्षाच्या आदिवासी पोरीची कमाल..! NASA च्या प्रकल्पासाठी निवड; ‘हे’ संशोधन ठरलं लक्षवेधी!

WhatsApp Group

Ritika Dhruw And NASA Project : छत्तीसगडची १६ वर्षीय मुलगी रितिका ध्रुव हिची नासाच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. सिरपूरची रहिवासी असलेली रितिका नयापारा येथील स्वामी आत्मानंद सरकारी इंग्रजी शाळेत इयत्ता अकरावीत शिकते. या प्रकल्पावर काम करण्यासाठी ती श्री हरिकोटा येथील इस्रोच्या केंद्रात पोहोचली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि शालेय शिक्षण मंत्री डॉ. प्रेमसाईसिंग टेकाम यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या प्रकल्पासाठी देशभरातून ६ मुलांची निवड करण्यात आली आहे.

लघुग्रह शोध मोहिमेचा भाग

रितिकाची ही निवड नासाच्या सिटीझन सायन्स प्रोजेक्ट अंतर्गत लघुग्रह शोध मोहिमेसाठी करण्यात आली आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय अन्वेषण सहकार्य कार्यक्रमांतर्गत इस्रोसोबतच्या भागीदारीचा एक भाग आहे. सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एसएसईआरडी) ने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये ६ ऑक्टोबरपर्यंत रितिकाचे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात ती नोव्हेंबरमध्ये बंगळुरू येथे इस्रो येथे होणाऱ्या लघुग्रह प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे.

हेही वाचा – विरारमध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू; धक्क्याने वडिलांचेही निधन

रितिकाला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड आहे. तिने ८वीच्या वर्गात प्रथमच अवकाश विज्ञान स्पर्धेत भाग घेतला. तेव्हापासून ती सातत्याने विज्ञानाशी संबंधित स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. नासाच्या प्रकल्पासाठी अर्ज केल्यानंतर रितिकाने सर्वप्रथम बिलासपूर येथे या विषयावरील स्पर्धेत भाग घेतला. यानंतर तिने आयआयटी भिलाई येथे प्रेझेंटेशन दिले. यानंतर रितिकाला इस्रोच्या श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) केंद्रात प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.

महाराष्ट्रातून दोन मुलांची निवड

या प्रकल्पात रितिकासोबत देशातील इतर सहा शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये व्होरा विघ्नेश (आंध्र प्रदेश), वेमपती श्रीयार (आंध्र प्रदेश), ओल्व्हिया जॉन (केरळ), के. प्रणिता (महाराष्ट्र) आणि श्रेयस सिंह (महाराष्ट्र). अवकाशातील निर्वात कृष्णविवरांमधून (Black Hole) आवाजाचा शोध यावर त्यांनी सादरीकरण केले. यामध्ये रितिका ध्रुवने तिच्या टीमचे नेतृत्व करत अतिशय उत्तम सादरीकरण केले. न्यायाधीशांच्या पॅनेलमध्ये डॉ. बेलवर्ड (नासा), डॉ. जोनाथन (इस्रो) आणि डॉ. ए. राजराजन (सतीश धवन स्पेस सेंटर) होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment