Nitin Gadkari : दोन वर्षांपूर्वी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान, कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दावा केला होता, की 2024 च्या समाप्तीपूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधांचा विकास अमेरिकेच्या तोडीचे असेल. त्यांनी सोबतच जॉन एफ केनेडी यांच्या विधानाची आठवण करून दिली होती. ”अमेरिका श्रीमंतीच्या जोरावर नव्हे, तर चांगल्या रस्त्यांमुळे पुढे आहे”, असे गडकरी म्हणाले होते. भारतातील रस्ते पायाभूत सुविधा लवकरच अमेरिकेच्या बरोबरीने येतील असा दावा गडकरींनी केला होता. बोधगया येथे आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना गडकरी म्हणाले की, बिहारमधील रस्ते आणि महामार्गांची अमेरिकेशी तुलना केली पाहिजे.
नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की 2029 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्रात सत्तेत 15 वर्षे पूर्ण करेल तोपर्यंत बिहारमधील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अमेरिकेच्या बरोबरीचे असेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत असलेल्या गडकरींनी बोधगया येथे सलग दोन कार्यक्रमांना संबोधित करताना ही माहिती दिली.
गडकरी म्हणाले, ”आमचे सरकार रस्ते पायाभूत सुविधांच्या बाबतीत वेगाने प्रगती करत आहे आणि हे बिहारमध्येही दिसून येत आहे. मी वचन देतो की सध्याच्या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर, जेव्हा आपण सत्तेत 15 वर्षे पूर्ण करू, तेव्हा बिहारचे रस्त्यांचे जाळे अमेरिकेच्या बरोबरीचे होईल.”
हेही वाचा – Whatsapp ग्रुपमुळे घरातच जन्माला आलं बाळ! ना डॉक्टर, ना हॉस्पिटल; पोलीसही चक्रावले!
गडकरी म्हणाले की, बिहारमधील रस्त्यांच्या जाळ्यात गेल्या काही वर्षांत कमालीची सुधारणा झाली असून भविष्यातही एनडीए सरकार विकासासाठी काम करत राहील. यावेळी त्यांनी 3,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
बिहारमध्ये ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यात राष्ट्रीय महामार्ग-20 चा बख्तियारपूर-राजौली विभाग आणि राजौली ते हल्दिया रस्ता रुंदीकरणाचा समावेश आहे. यामुळे झारखंड आणि बिहारमधील संपर्क सुधारेल आणि नवादा जिल्ह्यातील लोकांनाही त्याचा फायदा होईल. गडकरी यांनी हसनपूर ते बख्तियारपूर रस्ता रुंदीकरण विभागासह इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले ज्याचा नालंदा आणि पाटणा जिल्ह्यांदरम्यानच्या प्रवाशांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
गडकरींनी जाहीर केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये 5,100 कोटी रुपये खर्चून 90 किमी लांबीच्या मोकामा ते मुंगेर रस्त्याचे रुंदीकरण आणि 1,250 कोटी रुपये खर्चून नऊ शहरांमध्ये 11 रेल्वे ओव्हर ब्रिज यांचा समावेश आहे. पाटणा येथे 10 हजार कोटी रुपये खर्चून ग्रीनफिल्ड रिंग रोडची घोषणाही गडकरींनी केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!