Axis Bank च्या ग्राहकांना ‘मोठा’ धक्का..! कर्ज महागलं, EMI वाढला; वाचा कारण!

WhatsApp Group

Axis Bank Hikes MCLR : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये १० बेस पॉईंट म्हणजेच ०.१० टक्के वाढ केली आहे. आता अॅक्सिस बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. बँकेचे नवीन दर १९ फेब्रुवारी २०२२ पासून लागू झाले आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला, अॅक्सिस बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR ०.०५ टक्क्यांनी वाढवला होता.

बहुतेक ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते. आता तुम्हाला कर्ज घेताना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

अॅक्सिस बँकेचे नवीन MCLR दर

अॅक्सिस बँकेने ओवरनाइट MCLR दर ८.७०%, १ महिन्यासाठी दर ८.७०% आणि ३ महिन्यांसाठी दर ८.८०% केला आहे. त्याच वेळी, बँकेचा MCLR दर ६ महिन्यांसाठी ८.८५ टक्के, एक वर्षासाठी ८.९० टक्के, दोन वर्षांसाठी ९ टक्के आणि ३ वर्षांसाठी ९.०५ टक्के आहे.

हेही वाचा – फॅनचा स्पीड कमी ठेवला तर वीजेची बचत होते का? वाचा काय खरं नी काय खोटं!

साऊथ इंडियन बँकेनेही महाग केले कर्ज

खासगी क्षेत्रातील साऊथ इंडियन बँकेने देखील MCLR मध्ये १५-२० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. एक्सचेंजशी शेअर केलेल्या माहितीनुसार, नवीन दर २० फेब्रुवारीपासून लागू होईल. यापूर्वी, बँकेने जानेवारीमध्ये MCLR वाढवला होता, जो २० जानेवारीपासून लागू झाला होता.

MCLR म्हणजे काय?

विशेष म्हणजे, MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत.

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर ते म्हणाले, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ ०.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment