मुंबई : लहानपणी आपण अनेकदा चंद्राच्या गोष्टी ऐकल्या आहेत. या गोष्टीवरुन आपल्या प्रत्येकाच्याच मनात चंद्राबद्दल एक कुतुहल निर्माण झालं आहे. पांढरा शुभ्र गोलाकार दिसणारा हा चंद्र नेमका कसा तयार झाला असेल? जेव्हा माणूस पहिल्यांदाच इतक्या दूरच्या चंद्रावर पोहोचला तेव्हा काय घडलं असें, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. याच प्रश्नांची उत्तरे या लेखात तुम्हाला मिळतील.
राष्ट्रीय चंद्र दिवस
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये दरवर्षी २० जुलै रोजी राष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला जातो. मिशन अपोलो ११ चं यश हे त्यामागचं कारण आहे. पाच दशकांपूर्वी २० जुलै रोजी अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि एडविन बझ आल्ड्रिन पहिल्यांदाच चंद्रावर गेले होते. १९७१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा खास क्षण साजरा करण्याच्या आणि अविस्मरणीय बनवण्याच्या उद्देशानं २० जुलै हा चंद्र दिवस म्हणून घोषित केला. जगभरातील अंतराळ प्रेमी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
चंद्रावर पडलेल्या माणसाची ती पहिली पावलं खूप खास होती. एवढंच नाही तर या पाऊलखूणा आजही चंद्राच्या पृष्ठभागावर जशाच्या तशा आहेत. चंद्रावर वारा नसल्यामुळं या खुणा पुसल्या जात नाहीत त्यामुळं लाखो वर्षे या खुणा अशाच राहतील असा दावा केला जात आहे.
चंद्राची निर्मिती कशी झाली?
असं म्हणतात ४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीला थिया नावाचा ग्रह आदळल्यानंतर चंद्राचा जन्म झाला. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह आहे. विज्ञानानुसार पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे. यामुळेच चंद्रावरील व्यक्तीचं वजन कमी होतं.
चंद्रावर मिळणार हाय-स्पीड इंटरनेट
पृथ्वीवर इंटरनेटशिवाय जगणं सध्याच्या काळात खरंच कठीण आहे आणि कधीकधी चांगला इंटरनेट स्पीड मिळवणं आणखी कठीण होतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंटरनेट स्पीडची ही समस्या चंद्रावर येणार नाही. अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीचा दावा आहे की, येत्या दोन वर्षांत वाय-फाय चंद्रावर पोहोचेल. Aquarian Space नावाची ही कंपनी चंद्रावर हायस्पीड इंटरनेट पुरवण्याचा दावा करत आहे. यापूर्वी, नासानं चंद्रावर वाय-फाय इंटरनेट कनेक्शन देण्याची योजनाही जाहीर केली आहे.
अमेरिकेला चंद्रावर टाकायचा होता अणुबॉम्ब!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९५० मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध शिगेला पोहोचलं होते. त्यावेळी अमेरिकेनं अणुबॉम्बनं चंद्र उडवण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना अत्यंत गुप्त मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आली होती. या मोहिमेचं नाव स्टडी ऑफ लूनर रिसर्च फ्लाइट असं होतं. ज्याचं कोड नाव प्रोजेक्ट A119 होतं. योजनेनुसार, चंद्रावर स्फोट करून येथे उपस्थित असलेल्या धूळ, मातीसह वायूंची चाचणी केली जाणार होती. हे काम एका तरुण खगोलशास्त्रज्ञाकडे सोपवण्यात आलं होते. ही योजनाही अत्यंत गुप्तपणं राबवायची होती.
हेही वाचा – VIDEO : काय तो रस्ता, काय ते संगीत, संगळं कसं ओक्केमध्ये! ‘असा’ म्यूझिकल रोड पाहिलाय का?
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ही योजना लागू करण्यासाठी अमेरिकेला जमिनीवरून चंद्रावर क्षेपणास्त्र पाठवावं लागलं. हे क्षेपणास्त्र चंद्रावर २३८००० मैलांचा प्रवास करेल आणि स्फोट होईल. यासाठी शास्त्रज्ञांनी अणुबॉम्बची निवड केली होती कारण हा हायड्रोजन बॉम्ब खूप जड असल्याने चंद्रावर पाठवणं अवघड होतं. पण हे मिशन अमेरिकन लष्करानं पूर्णपणे नाकारलं. जर हे मिशन यशस्वी झाले नाही तर त्याचा पृथ्वीवर परिणाम होईल, असं लष्करानं म्हटलं होतं. लष्करानंही याचे भयंकर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली होती, त्यानंतर ही योजना मागे घेण्यात आली.
आता अवकाशात अमेरिका आणि चीन यांच्यात शर्यत सुरू झाली आहे. चंद्रावरून अमेरिका आणि चीनमध्ये शत्रुत्व आहे. २०३५ मध्ये अमेरिका चंद्रावर आपलं तळ स्थापन करण्याचं उद्दिष्ट साध्य करेल अशी अपेक्षा आहे. अमेरिकेला चंद्राच्या पृष्ठभागाऐवजी आपल्या कक्षेत आपला तळ तयार करायचा आहे, तर चीनला आपला तळ पृष्ठभागावरच तयार करायचा आहे.