Goval Woman Smashes Alcohol Bottles : नारी शक्ती एकवटली तर काय होऊ शकतं, याचा प्रत्यय देवगड तालुक्यातील गोवळ या गावात आला आहे. वारंवार सांगूनही गावात अवैध, गोवा बनावटीची दारू विक्री करणे न थांबवल्यामुळे महिलांनी गावातील दारूचे दुकान उध्वस्त केले. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपल्याने महिला एकत्र आल्या आणि त्यांनी मोठे पाऊल उचलत रस्त्यानजीक चालणारे दारुचे दुकान उद्ध्वस्त केले.
विजयदुर्ग-तरेळे मार्गावरील गोवळ धनगरवाडा येथे गोविंद कोकरे नामक व्यक्ती मागील दोन-तीन वर्षांपासून अवैध दारूची विक्री करत होता. यामुळे गोवळमधील महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता. दिलेल्या माहितीनुसार, या दारुमुळे गावातील एका 20 वर्षीय तरुणाचे निधनही झाले. शिवाय अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले. या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
वारंवार सांगूनही गावात अवैध, गोवा बनावटीची दारू विक्री करणे न थांबवल्यामुळे महिलांनी देवगडमधील गोवळ गावातील दारूचे दुकान उध्वस्त केले. #Illegal #liquor #Devgad pic.twitter.com/8oQvNrB0DW
— Vacha Marathi (@VachaMarathi) October 12, 2024
याआधीही ‘हा धंदा बंद कर’, अशी सक्ती ताकीद नागरिकांनी संबंधित विक्रेत्याला दिली होती. त्याने गावातील मंदिरात सर्वांसमोर माफी मागून हे सर्व बंद करेन, असे सांगितले होते. पण लपून-छपून दारुविक्री करणे चालूच होते, असे नागरिकांनी सांगितले. शेवटी दसऱ्याच्या एक दिवस आधी गोवळ गावठण येथील महिलांनी एकत्र येत कोकरेच्या दुकानावर धाड टाकली. तेव्हा घरात दारू असल्याचे कळले. महिलांनी रस्त्यावर येत सर्व दारूच्या बाटल्या फोडल्या. घटनेवेळी विक्रेता कोकरे पसार झाला. विजयदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहत पुढची कारवाई केली.
गोवळ दारुबंदी कमिटीचे अध्यक्ष विष्णू घाडी, सरपंच दक्षता दिनेश मेस्त्री, माजी सरपंच राजेश जठार, पोलीस पाटील मंगेश आलव, तंटामुक्तीचे सदस्य आणि गावातील लोक घटनास्थळी उपस्थित होते. गावाचे बिघडत चाललेले सामाजिक आरोग्य सावरण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेतल्याने संबंधित अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!