Vatar In Konkan : ”आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो…वातर करूचो हा माका वेळ नाया…अरे यंदा वातर करूचो रव्हलो….”, ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि नवा माणूस आल्यानंतर त्याला हे तळकोकणातील ‘वातर’ म्हणजे काय हे ठाऊक नसतं. भारतात शेतीसंस्कृती फार पिढ्यानपिढ्या बदलत चालली आहे. अनेक नवनवे प्रकार राबवले जात आहेत, पण काही प्रकार हे फार पूर्वीपासून आजच्या 5G जगातही तितक्याच यशस्वी पद्धतीनं अवलंबले जातात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे वातर.
वातर म्हणजे काय रे भाऊ?
थोडक्यात काय ‘वातर’ म्हणजे जमिनीची मशागत. ह्यालाच सर्वसामान्य भाषेत ‘भाजावळ’ असंही म्हटलं जात. तळकोकणात भात, नाचणी किंवा कुळीद केला जातो. त्यासाठी सुपीक आणि जलसमृद्ध जमिन मिळणं आवश्यक असतं. पाऊस आणि नदीचं पाणी मुबलक असलं तरी जमिनिला मानवनिर्मित काहीतरी करणं आवश्यक असतं, यासाठी वातर हा जमिनीची सुपिकता वाढवण्याचा प्रकार मानला जातो.
हेही वाचा – देवगडमध्ये २२ कोटींची देवमाशाची उलटी जप्त..! सहा जणांना अटक
वातर कसा करतात?
साधारण जानेवारी ते मे महिन्यापर्यंत हापूस हंगाम तळकोकणात होतो. त्यामुळे भातशेतीनंतरच्या जमिनीकडं शेतकऱ्याचं दुर्लक्ष होतं. आंबा हंगामात बागायती कामं भरपूर असतात. पण आंबा हंगाम जसा संपतो, तसा शेतकरी या जमिनीच्या मशागतीकडं वळू लागतो. मान्सून येण्यापूर्वी शेतकरी एकंदरीत पावसाचा आणि हवामानाचा अंदाज घेतो. मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या भातजमिनीत वातर करतो. गुराचं सुकलेलं शेण, सुकलेलं गवत, नारळाच्या सुकलेल्या झावळ्या, पतेरा, झाडांच्या सुकलेल्या फांद्या या एकत्र करून भातजमिनीच्या एका कोपऱ्यात आणल्या जातात आणि पसरवल्या जातात. मग आग लावली जाते. ही आग लावताना शेतकरी तिथे स्वत: हजेरी नोंदवून आग बाहेर जाणार नाही ना याची काळजी घेतो. कधीकधी आग आटोक्यात आली नाही, तर आजुबाजूला असणारी हापूस, फणसाची झाडे धगावण्याचा धोका असतो. त्यामुळं सरळ-सोपा वाटणारा वातर दक्षपूर्वकच करावा लागतो.
जर वातर केला नाही, तर….
वातर केलेली आग तुमच्या जमिनीच्या कोपऱ्याच्या आकारमानानुसार २० ते ३० मिनिटात जळून जाते. यानंतर पूर्ण जमिन काळी पडते आणि तिला योग्यतेनुसार उष्णता मिळते. याचा परिणाम म्हणून अनावश्यक रान येणं मोठ्या बंद होतं. जर वातर केला नाही, तर भातजमिनीत मोठ्या प्रमाणात रान येऊ शकतं आणि भात रुजून येताना शेतकऱ्याला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे वातर केल्यानंतर शेतकरी पावसाची वाट बघतो आणि तसाच पाऊस पडला की तो पेरणीकडं वळतो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!