मुंबई : एखादं गाव संपूर्ण रिकामं झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? तीन-चार दिवसांसाठी लोक गावाच्या वेशीवर जाऊन राहतात आणि हे दिवस संपले की परत गावात येतात. माणसांसकट गुरं-ढोरंही गावाच्या बाहेर असतात, तिथेच सगळं बस्तान बसवलं जातं, चर्चा-बैठका होतात तेही आनंदानं. खरंच हे ऐकायला जेवढं भारी वाटत असेल, तर प्रत्यक्षात अनुभव घ्यायचा असेल तर किती मजा येईल? कोरोना, लॉकडाऊनमध्ये हा प्रकार विचार न करता येण्यासारखा असला, तरी आपल्या पूर्वजांचं वचन म्हणून आजही ही परंपरा जोपासली जाते. प्रत्येक गाव हा काहीनाकाही विलक्षण गोष्टींनी भरलेला असतो. त्यातीलच हा एक प्रकार तळ कोकणात सापडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या या प्रथेला गावपळण म्हटलं जातं. आचरा गावात ही गोष्ट दर तीन वर्षांनी केली जाते.
गावपळण म्हणजे काय?
गावपळण हा काय प्रकार आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात कुतूहूल निर्माण करतो. सिंधुदुर्गातील इतर जिल्ह्यांनाही या प्रथेविषयी कल्पना नसेल. या गावपळणकडं अंधश्रद्धा म्हणून पाहण्याचा विषयही चघळला जातो. आचऱ्यातील चिंदर गावात दर तीन वर्षानंतर तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी गावपळण होते. रामेश्वर हे या गावाचं दैवत आहे. गावपळणीची तारीख ठरवण्यासाठी रामेश्वराची इच्छा ज्याला कौल म्हणतात ते घेतला जातो. एकदा कौल मिळाला की निश्चित दिनी पहाटे लोक गावाच्या बाहेर निघून जातात.
वाडीनुसार प्रत्येकांनी एका ठिकाणी राहायची व्यवस्था केलेली असते. या तीन दिवसात लागणारे कपडे, अन्नधान्य किंवा इतर वस्तूही सोबत घेतलेल्या असतात. गावपळणीची घोषणा करण्यावेळी रामेश्वर मंदिरात सर्जजण एकत्र येतात आणि ही घोषणा झाली की सर्वजण गावाबाहेर पळतात. आपल्या राहण्यासाठी कावणं बाधलेली असतात, जी नारळाच्या झावळ्यांनी बांधलेली असतात. संपूर्ण गाव रिकामं होतं आणि गावात संपूर्ण शांतता असते. माणूस विविध गोष्टींना सामोरं जात असतो, त्यामुळं चांगली हवा, निसर्गस्वच्छ पाणी, चांगलं वातावरण, रोजच्या दगदगत्या जीवनपद्धतीतून ‘ब्रेक’ची मजा घेण्यासाठी गावपळण केली जाते.
गावात प्रवेश कधी?
जुनी लोक गावपळणीमागं विविध कथा सांगतात. त्यात वाईट शक्तींचा वावर, भूतांच्या गोष्टी, देवीचा वास अशा गोष्टी आहेत. पण शास्त्रीय कारणांनुसार पाहिलं, तर गावपळण म्हणजे काही दिवसांची मजा असते. चाकरमानी मंडळी गावपळणीसाठी मुद्दाम सुट्टी टाकून शहरातून गावाकडं वाट धरतात. गावपळणीच्या शेवटी म्हणजे तीन दिवसाअंती देवाचा पुन्हा कौल घेतला जातो. हा कौल झाला की सर्वजण गावात प्रवेश करतात.