Sudha Murthy To Inaugurate Baparde College : ‘इन्फोसिस’चं नाव ऐकलं की प्रत्येकाच्या मनात नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचं नाव येतं. आज इन्फोसिसची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अव्वल आयटी कंपन्यांमध्ये केली जाते. इन्फोसिसचं साम्राज्य उभं करण्यात नारायण मूर्तींना त्यांच्या पत्नीनं खूप मदत केली. त्यांनी उधार दिलेल्या १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर इन्फोसिसनं पुढे विकासाच्या कक्षा रुंदावल्या. सुधा मूर्ती ही अशी व्यक्ती आहे जी साधेपणानं आयुष्य जगते. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत, ज्या आज लाखो महिलांसाठीही प्रेरणास्थान आहेत. याच सुधा मूर्ती कोकणातील एका गावात येणार आहेत. यासाठी गावाचीही उत्सुकताही वाढीस लागली आहे.
सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात बापर्डे नावाचं गाव आहे. या गावातील श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ या संस्थेच्या यशवंतराव राणे शाळेला सुधा मूर्तींनी देणगी दिली होती. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर जिंकलेली संपूर्ण रक्कम रु. २५ लाख मूर्तींनी या शाळेला देऊ केली. आता या शाळेला मूर्ती भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
हेही वाचा – “गावात आल्यानंतर…”, बापर्डे ग्रामपंचायतीचं काम पाहून भारावली राज्यस्तरीय समिती!
कधी येणार सुधा मूर्ती?
दिवंगत माजी आमदार अमृतराव राणे यांच्या संकल्पनेतून श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ शिक्षणसंस्था मागील १० वर्षांपासून कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे या संस्थेला शाळेत ६वी ते १२वी पर्यंतचा अभ्यासक्रम स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर चालवण्यास मान्यता मिळाली. यानिमित्तानं संस्थेच्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा औपचारिक उद्घाटन सोहळा ९ नोव्हेंबरला बापर्डे येथी आप्पा देऊ घाडीगावकर विद्यानगरीत प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी सुधा मूर्ती उपस्थित असतील. त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे IAS, CEO प्रसेनजित नायर, ह्रदयरोग तज्ञ डॉ. सुरेश जोशी आणि भारतीय नौदलातील अधिकारी उपस्थित असतील. या कार्यक्रमाला बापर्डे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना निमंत्रण मिळाले आहे.