

State Level Committee Visited Baparde Gram Panchayat : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये कोकण विभागात प्रथम आलेले सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील बापर्डे गाव आणि येथील ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरले आहे. गावातील नाविन्यपूर्ण स्वच्छतेबाबतचे उपक्रम राज्यस्तरीय समितीलाही भावले. या ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय समितीने बापर्डे गावाला भेट देऊन तपासणी व पाहणी केली. यावेळी या समितीत पाणीपुरवठा व स्वच्छता तथा अध्यक्ष राज्य स्तरीय समिती मंत्रालय अव्वर सचिव चंद्रकांत मोरे यांनी बापर्डे ग्रामपंचायतच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. बापर्डे गावचे सरपंच संजय लाड आणि ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी सर्वाना एकत्रित आणत केलेले हे स्वच्छतेचे काम गावाला एका नव्या शिखरावर नेईल, असा विश्वास मोरेंनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय समिती गावात आल्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर मोरेंनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ”गावात आल्यानंतर मला एकजूट कशी असते, याची जाणीव झाली. एकजुटीमुळं गावाचा कसा विकास करून घ्यायचा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे बापर्डे गाव आहे. बापर्डे हे वाड्यामध्ये विखुरलेलं असलं, तरी विकासासाठी एकत्र येणं हीच तुमची मालमत्ता आहे. भजनी बुवा संदीप नाईकधुरे यांचे विशेष कौतुक करायला हवं. कारण भजनाच्या स्वच्छतेबाबत केलेले जनजागृती महत्वाची आहे.”
हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?
यावेळी व्यासपीठापर कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे, उपमुख्यकार्यकारी विनायक ठाकुर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, बापर्डे सरपंच संजय लाड, उपसरपंच देवळेकर, ग्रामसेवक शिवराज राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने बापर्डेवासियांनी हजेरी नोंदवली होती.
स्वच्छतेत विशेष योगदान दिलेल्या बापर्डेतील स्वच्छता दुतांचा चंद्रकात मोरेंनी आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये स्वच्छता कर्मचारी उमेश सकपाळ, भजनी बुवा संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, माजी जिं .प सदस्या अनघा राणे, रूपेश मोंडकर, बचतगट प्रतिनिधी वृषाली नाईकधुरे, अनाजी नाईकधुरे, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. चित्रा पाटील, प्रशांत देवळेकर आदींचा सत्कार करण्यात आला.