कुणकेश्वरच्या विकासासाठी निधी मिळणार? नितेश राणेंनी घेतली CM शिंदेंची भेट!

WhatsApp Group

Nitesh Rane Met CM Eknath Shinde : कुणकेश्वर मंदिर हे तळकोकणातील सुप्रसिद्ध देवस्थान मानले जाते. अनेक भक्तगण या देवस्थानाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देतात. आता या मंदिराचा आणि परिसराचा अजून विकास व्हावा, यासाठी भाजप आमदार नितेश राणेंनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जाऊन नितेश राणेंनी सिंधदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिर आणि तेथील परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी केली.

नितेश राणेंचे ट्वीट..

नितेश राणेंनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये राणे म्हणाले, ”माझ्या मतदारसंघातील श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान, ता. देवगड या भागात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे, परिसराचे सुशोभीकरण आणि या गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदेजी आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढाजी यांची भेट घेतली.” यासोबत राणेंनी दोन फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : वसीम अक्रमची जीभ घसरली..! समोर बसलेल्या खेळाडूला म्हटलं गाढव? पाहा Video

कुणकेश्वर मंदिराबाबत..

कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव ‘हापूस आंब्या’साठी खूप प्रसिद्ध आहे. श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते.

Leave a comment