भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

WhatsApp Group

मुंबई : केवळ भारतच नाही तर जगातील सर्वात भीतीदायक म्हणजेच ‘हाँटेड’ ठिकाणाबद्दल बोललं तर कुलधाराचं नाव सर्वात वर येतं. राजस्थानमधील जैसलमेरपासून १४ किमी अंतरावर असलेलं कुलधारा गाव गेल्या २०० वर्षांपासून ओसाड पडलेल्या ठिकाणांमध्ये येतं. असं मानलं जातं की हे गाव १३०० साली पालीवाल ब्राह्मण समाजानं सरस्वती नदीच्या काठावर वसवलं होतं. एके काळी या गावात खूप उपक्रम होत होते. मात्र आज अशी परिस्थिती आहे की, माणूस येथे भटकायलाही घाबरतो आणि २०० वर्षांपासून या ठिकाणी पुनर्वसन झालेलं नाही.

कुलधाराचा इतिहास

कुलधारा गाव हे मूळचं ब्राह्मणांनी वसवलं होतं, जे पाली भागातून जैसलमेरला स्थलांतरित होऊन कुलधारा गावात स्थायिक झाले होते. या गावातील पुस्तकं आणि साहित्यिक वृत्तांत असं म्हटलं आहे की पाली येथील कधान या ब्राह्मणानं प्रथम या ठिकाणी आपलं घर बांधलं आणि एक तलावही खोदला, ज्याला त्यानं उधंसर असं नाव दिले. पाली ब्राह्मणांना पालीवाल म्हणत.

हेही वाचा – वाचून चक्रावाल…तीन दिवसांसाठी ‘या’ गावात माणसं सोडाच, पण काळं कुत्रही फिरकत नाही! 

रातोरात गाव गायब!

लोकप्रिय दंतकथेनुसार, १८००च्या दशकात, हे गाव एक जहागीर किंवा राज्य मंत्री सलीम सिंग यांच्या अंतर्गत असायचं, ज्यांनी कर गोळा करून लोकांचा विश्वासघात केला. ग्रामस्थांवर लादल्या जाणाऱ्या करामुळं इथले लोक खूप नाराज असायचे. असं म्हटलं जातं की सलीम सिंगला गावातील प्रमुखाची मुलगी आवडली आणि त्यांनी गावकऱ्यांना धमकी दिली, की जर त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा मार्गात आला तर तो अधिक कर वसूल करू लागेल. आपल्या गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तसेच आपल्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी प्रमुखासह संपूर्ण गाव रातोरात पळून गेला. गावकरी गाव ओसाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले. येत्या काळात येथे कोणीही राहू शकणार नाही, असा शाप गावकऱ्यांनी गाव सोडताना दिल्याचं सांगितलं जातं.

आताची परिस्थिती काय?

कुलधारा गाव हे आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानं संरक्षित केलेलं ऐतिहासिक स्थळ आहे. पर्यटक येथे फिरू शकतात आणि त्या काळात काय घडलं त्याची झलक तुम्हाला पाहायला मिळेल. कुलधारा प्रदेश हा विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला असून, सुमारे ८५ छोट्या वसाहतींचा समावेश आहे. गावातील सर्व झोपड्या मोडकळीस आलेल्या आहेत. येथे एक देवी मंदिर देखील आहे, जे आता भग्नावस्थेत आहे. मंदिराच्या आत शिलालेख आहेत ज्यामुळे पुरातत्वशास्त्रज्ञांना गाव आणि तेथील प्राचीन रहिवाशांची माहिती गोळा करण्यात मदत झाली आहे.

तुम्ही रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत गावात फिरू शकता. हे ठिकाण भुताटकीचे मानलं जात असल्यानं स्थानिक लोक सूर्यास्तानंतर दरवाजे बंद करतात. कुलधरा गावासाठी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती १० रुपये आहे आणि जर तुम्ही गाडीनं आत जात असाल तर शुल्क ५० रुपये आहे.

Leave a comment