भारतातील एकमेव गाव, जिथं आजही घरोघरी संस्कृत बोललं जातं!

WhatsApp Group

Sanksrit speaking village : एकीकडं आधुनिक वातावरण, जीवनशैली आणि इंग्रजी भाषेचं वर्चस्व शहरांबरोबरच खेड्यापाड्यांवरही होत आहे. पण दक्षिण भारतात एक असं गाव आहे जिथं घरोघरी संस्कृत बोलली जाते. यावेळी तुम्ही फेरफटका मारत असाल तर हे गाव बघून इथल्या परिसराची आणि संस्कृतीची ओळख करून घेता येईल. इथं गेल्यावर तुम्हाला दिसेल की आपण ज्या प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनात हिंदी किंवा इंग्रजी तसेच स्थानिक बोली आणि भाषांचा वापर करतो, त्याच प्रकारे इथले लोक कोणाशीही बोलताना संस्कृत भाषा वापरतात. हे पाहून तुम्हाला आधी आश्चर्य वाटेल, कारण शहरांमध्ये संस्कृत भाषा दररोज बोलताना आपण कधी ऐकत नाही. एकतर तुम्हाला विद्यापीठाच्या वर्गात किंवा कोणत्याही संस्कृत चर्चासत्रात आणि उपासनेत संस्कृत बोलताना ऐकण्याची आणि पाहण्याची संधी मिळते.

घरोघरी संस्कृत बोलल्या जाणाऱ्या या गावाचं नाव काय?

या गावाचं नाव मत्तूर आहे. जे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गावात सुमारे ३०० कुटुंबं राहतात. ज्यांच्या घरात संस्कृत ही बोलचालीची भाषा म्हणून वापरली जाते. हे गाव पाहायला जाणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव येतो. संस्कृत बोलण्यासोबतच गावकऱ्यांचे पोशाख पाहून तुम्हाला आनंद होईल. इथं गेल्यावर तुम्हाला वाटेल, की या गावानं जगातील सर्वात जुनी भाषा आणि सभ्यता जपली आहे.

हेही वाचा – ज्या ठिकाणी श्रीकृष्णानं प्राण सोडले, तिथं आता काय आहे?

हे गाव बंगळुरूपासून ३२० किमी अंतरावर आहे. एवढंच नाही, तर येथील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मूल संस्कृत शिकतं. येथे तुम्हाला दुकानदारांपासून ते लहान मुलांपर्यंत अस्खलित संस्कृत बोलताना पाहायला मिळेल. खर्‍या अर्थानं वैदिक जीवनशैली पहायची असेल, तर ती या गावात पाहायला मिळेल. हे गाव बारमाही तुंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. इथं तुम्हाला लहान मुलं संस्कृत ग्रंथ वाचताना आणि आपापसात बोलताना दिसतील.

याचं श्रेय कोणाला?

असं म्हणतात की १९८० पासून घरोघरी संस्कृत वाचण्याची आणि संस्कृत भाषा सामान्य भाषा म्हणून वापरण्याची प्रथा वाढली. ज्याचं श्रेय संस्कृती भारती संस्थेला जातं. १९८१ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेनं इथं दहा दिवसीय संस्कृत कार्यशाळा आयोजित केली होती. तेव्हापासून इथं संस्कृत भाषेचा प्रकाश पडला. या गावात पुरातन ब्राह्मण समाजाचे संकेथी लोक राहतात. ज्यांच्याबद्दल असं म्हटलं, जातं की हे लोक सुमारे ६०० वर्षांपूर्वी केरळमधून इथं स्थायिक झाले होते. तुम्हीही या गावाला भेट देऊ शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment