साताऱ्यातील मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लोकार्पण

WhatsApp Group

Maharashtra Launches First Solar Village : राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीजग्राहकांचे वीज बिलदेखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये ‘महावितरण’च्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौर ग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मान्याचीवाडीचे सरपंच  रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प)  प्रसाद रेशमे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे. उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कायमस्वरुपी सुरु राहणार

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या दीड वर्षांमध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे १२ हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही. राज्याने सौर ऊर्जेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून मान्याचीवाडीचे आज लोकार्पण झाले याचा आनंद आहे. या गावात पूर्वी ५ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल येत होते. ते सौर ग्राममुळे शून्य झाले आहे. आता राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यासाठी गावांची निवड झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे,  महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे, मुख्य अभियंता  अंकुश नाळे यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment