International Hindi Bhasha Bhushan Award : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील ‘बापर्डे’वासियांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. या गावातील शिक्षिकेला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर २०२२ रोजी नेपाळच्या काठमांडू येथे ‘हिंदी शिक्षक तथा साहित्यिक संमेलन’ पार पडणार आहे. याकरता दोन्ही देशांचे सुमारे १०० हिंदी शिक्षक या संमेलनात सहभागी होतील. या संमेलनामध्ये मोंड येथील शां. वि. कुळकर्णी विद्यामंदिरच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका आणि प्रभारी मुख्याध्यापिका आसावरी सुनिल कदम यांना ‘आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
केंद्रीय समितीकडून कदम यांची निवड
या मोठ्या पुरस्कारासाठी आसावरी कदम यांची निवड ‘हिंदी शिक्षक तथा साहित्यिक संमेलनाचे’ संयोजक डॉ. कैलास जाधव, भारत सरकार व स्वागताध्यक्ष संगिता ठाकूर, काठमांडू नेपाळ तसेच केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी यांच्या केंद्रीय समितीने केली आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर आसावरी कदम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. छोट्या गावातून एक महिला शिक्षिका आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले आणि गावाचे नाव मोठे करत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – देवगडच्या बापर्डे गावात येणार ‘ग्रेट’ सुधा मूर्ती..! ‘या’ कॉलेजचं होणार भव्य उद्घाटन
मोंड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आसावरी कदम यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.