Video : सुधा मूर्तींचं बापर्डे शाळेत जोरदार स्वागत..! सर्वांना भावला मराठी साज अन् साधेपणा

WhatsApp Group

Sudha Murthy Grand Welcome In Baparde School : ‘बापर्डे’ गाव ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं तो क्षण ९ नोव्हेंबरला सकाळी आला. पद्मश्री आणि जेष्ठ समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती गावात आल्या आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना निर्माण झाली. अनेक दिवस मूर्ती गावात येणार म्हणून जोरदार तयारी सुरू होती. तळकोकणात तेही एका छोट्या गावात मूर्तींचं आगमन होईल, असा विचारही कुणी केला नव्हता. तीन-चार डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव, जिथं काही वर्षांपूर्वी व्यवस्थित संपर्काची साधनं नव्हती, अशा ठिकाणी जागतिक प्रतिष्ठा लाभलेली व्यक्ती येणं म्हणजे आश्चर्याची बाबच. पण गावाचं नाव मोठं होतंय ही समाधानाची बाबच प्रत्येक ग्रामस्थाच्या ओठावर आहे.

सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात बापर्डे नावाचं गाव आहे. या गावातील श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ या संस्थेच्या यशवंतराव राणे शाळेला सुधा मूर्तींनी देणगी दिली होती. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर जिंकलेली संपूर्ण रक्कम रु. २५ लाख मूर्तींनी या शाळेला देऊ केली. यानंतर मूर्तींनी शाळेला आणि नव्या होणाऱ्या कॉलेजच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले. बापर्डेतील ग्रामस्थ, मुंबईतील चाकरमानी, दोन्ही ठिकाणचे विकास मंडळ यांनी मूर्तींना शाळेपर्यंत आणण्यासाठी मोलाचं योगदान दिलं.

हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?

 

शाळेत मूर्तींनी काय सांगितलं?

बापर्डे शाळेत येताच सुधा मूर्तींना लेझीम-झांज पथकानं स्वागत केलं. त्यानंतर मूर्तींना शाळेच्या पायऱ्यांवर मुलींनी ओवाळलं. यावेळी त्यांच्यासोबत नौदलाचे अधिकारीही उपस्थित होते. मान्यवरांना विद्यार्थ्यांकडून परेडच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मूर्तींनी “या कुन्देन्दु तुषारहारधवला” श्लोक म्हणत सरस्वतीला वंदन केलं. शाळेच्या वर्गात काढलेल्या आपल्या चित्रस्वरुप रांगोळीलाही त्यांनी दाद दिली. मुंलासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मूर्तींनी मार्गदर्शन केलं. ”तुम्ही तुमच्या गोल्डन पिरियडमध्ये जगत आहात. आज जी मेहनत कराल, त्याचं यश तुम्हाला मिळेल. आजच्या व्यावहारिक जगात तुमच्या मातृभाषेसह इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे. कृष्णाला जशा दोन माता होत्या, तशाच तुम्ही या दोन भाषांना स्थान दिलं पाहिजे. मोबाईलला गरजेनुसार वापरा. १६व्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला होता आणि आपण काय काय करायला हवं याचं ध्येय मनात असू द्या”, असं मूर्तीनी विद्यार्थ्यांना सांगितलं. सुधा मूर्तींनी लिहिलेल्या पुस्तकांचीही ओळख या कार्यक्रमावेळी लोकांना झाली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment