मुंबई : मध्यप्रदेशच्या श्योपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेता गावात सात वर्षांचा मुलगा आंघोळीसाठी गेला होता. यादरम्यान, काही लोकांनी कथितपणे दावा केला, की मुलाला एका मगरीनं जिवंत गिळलं आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर गावातील लोक लाठ्या-काठ्या घेऊन तिथं पोहोचले. त्यानंतर रागाच्या भरात मगरीला बांधून नदीतून बाहेर काढण्यात आलं.
पोलीस घटनास्थळी दाखल
गावकऱ्यांनी मगरीला बांधून रिकाम्या जागी नेलं. नंतर दोरीनं बांधलं. तोंडात एक मोठा बांबू देखील ठेवला जेणेकरून ती मगर मुलाला बाहेर काढू शकेल. जोपर्यंत मगर मुलाला तोंडावाटे बाहेर काढत नाही, तोपर्यंत तिला सोडणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. याची माहिती मिळताच वनविभाग व वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोबतच गावकऱ्यांना त्यांनी मगरीला सोडण्याचा सल्ला दिला.
तासाभराच्या समजुतीनंतर ग्रामस्थांनी मगरीला नदीत सोडलं. यासोबतच अधिकाऱ्यांनी मगरीला मारण्यापासून बचावलं. त्याचबरोबर चंबळ नदीत संबंधित मुलाचा शोध सुरू करण्यात आला. मंगळवारी सकाळी मुलाचा मृतदेह सापडल्याचं सांगण्यात आलं. त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला होता.
मगरीचं पोट चिरण्याची मागणी!
मगरीच्या पोटाला चिरून मुलाला बाहेर काढावं, अशी मागणी ग्रामस्थ वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडं करत होते. घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले होते. दरम्यान, एसडीआरएफची टीमही चंबळ नदीत मुलाच्या शोधात गुंतली होती. सायंकाळी उशिरापर्यंत बचाव पथकाला नदीत काहीही सापडलं नव्हतं. सायंकाळी मदतकार्य थांबवण्यात आलं. सकाळी पुन्हा मुलाचा शोध सुरू केला असता मृतदेह सापडला.
७ वर्षाच्या मुलाला गिळलं, असा समज होताच मध्यप्रदेशमध्ये गावकऱ्यांनी मगरीला बांधून ठेवलं. #crocodile #MP #vachamarathi pic.twitter.com/rBzuPYebXB
— Vacha Marathi (@VachaMarathi) July 12, 2022
पोलिसांनी काय सांगितलं?
मगरीनं मुलाला गिळलं नसतं असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्याचवेळी ही मगर मानवभक्षक झाली असून तिला दूरच्या ठिकाणी सोडण्यात यावं, असा युक्तिवाद ग्रामस्थांनी केला. नदीत शेकडो मगरी असून, मानवांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडल्याचं वनविभागानं सांगितलं. मगरीला ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.