सिंधुदुर्गातील ‘असं’ गाव जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत!

WhatsApp Group

मुंबई : जसा गाव तशा परंपरा..! खरंच जगात कुठे, काय, कशा पद्धतीत गोष्टी आढळतील हे सांगता येणं कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, रुढी फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचं पालण करणं हे आजही तितकंच महत्त्वाचं असतं, हे त्या-त्या ठिकाणच्या लोकांवरून कळतं. नवीन गोष्टी आपल्याशा करणं, किंवा आपल्या जुन्या जीवनपद्धतीत बदल करणं याकडं हे लोक दुर्लक्ष करतात. जुनं ते सोनं असतं या गोष्टीवर लोकांची अफाट श्रद्धा असते. असंच काहीसं महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलं आहे. निसर्गरम्य, पर्यटन, नारळ-मत्स्यसंपत्तीनं समृद्ध अशी या जिल्ह्याची ओळख आहे. त्यात देवगड तालुक्याचं नाव अनेक वेळा नाना कारणांनी आपल्या समोर येतं. 

देवगड तालुक्यात असं एक गाव आहे, जिथं मांसाहार चालतो, पण चिकन-मटण-अंडी खाल्ली जात नाहीत. हो ऐकायला हे वेगळं-विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. देवगड तालुक्यात बापर्डे नावाचं एक गाव आहे. या गावात अनेक वाड्या आहेत. त्यापैकी नाईकधुरेवाडी ही आपल्या एका परंपरेमुळं प्रसिद्ध आहे. या वाडीतील नाईकधुरे आडनावाची लोक मांसाहार करतात, पण चिकन-मटण-अंडी खात नाहीत. 

ऐकलंय का असं कुठे?

या वाडीत तुम्हाला कोंबडी, शेळ्या-बकरी किंवा दुकानात अंडी दिसणार नाहीत. या तीन गोष्टींना हात लावण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. शहरात कामा-धंद्याला असणारा  या वाडीतील व्यक्तीही या गोष्टीचं पालन करतो. बाहेरचा माणूस या प्रथेबद्दल विचारतो, तेव्हा तोही हा प्रकार ऐकून चक्रावतो. थोडक्यात पाळीव प्राण्यांचा मांसाहार करण्यास नाईकधुरेंना परवानगी नाही. शिवाय मद्यपान करणंही नाईकधुरे पाप मानतात. चिकन-मटणवर बंदी असली, तरी ही लोक मासे, समुद्रातील इतर मत्स्यप्रकार यांचा आस्वाद घेऊ शकतात. या वाडीत लग्न करून येणाऱ्या बाहेरच्या मुलीलाही हीच प्रथा आयुष्यभर पाळावी लागते, पण लग्न करून बाहेर जाणारी ‘नाईकधुरे’ मुलगी इच्छा असल्यास चिकन-मटण-अंडी खाणं सुरू करू शकते. 

हेही वाचा – भारतातील सर्वात रहस्यमय गाव! एका रात्रीत गायब झाले हजारो लोक; काय घडलं होतं?

खाण्यापिण्याबाबत दक्षता

चायनीज, केक आणि हॉटेल खाद्यपदार्थ खाताना खातानाही या वाडीतील लोकांना दक्षता घ्यावी लागते. केक, चायनीज संपूर्ण शाकाहारी असेल तरच त्याला हात लावला जातो. या प्रथेमागचं मूळ आणि ठोस कारण अजूनही कोणाला सांगता येत नाही. जे जुने-जाणते आहेत, त्यांनाही विचारलं तर ते आपल्या पूर्वजांच्या आणि देवाच्या आज्ञेनुसार ही  प्रथा पाळली जाते, असं सांगतात. पण वाडीत स्वच्छता आणि मद्यपानबंदी असल्यामुळं शांतता कायम जोपासली जाते. काहीही असलं तरी ही गोष्ट सर्वांच्याच मनात कुतूहूल निर्माण करते.

Leave a comment