भारतातील ‘असं’ हॉटेल, जिथं जेवणासाठी पैसे नाही तर प्लास्टिक द्यावं लागतं!

WhatsApp Group

मुंबई : १ जुलैपासून देशभरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून प्लास्टिक स्टिक इअर बड्स, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीमच्या काड्या, प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिक कप, प्लास्टिक पॅकिंग वस्तू इत्यादी सर्व गोष्टींवर बंदी आहे. कारण या प्रकारचं एकदा वापरलेलं प्लास्टिक सहजासहजी नष्ट करता येत नाही. त्यामुळं प्रदूषण वाढतं. पर्यावरणात विषारी रसायनांचा समावेश होतो, जे मानव आणि प्राणी दोघांसाठीही घातक ठरतात.
मात्र, भारतात असं एक रेस्टॉरंट आहे जिथं आवडीचे पदार्थ खाण्यासाठी पैसे नाही तर प्लास्टिक द्यावं लागतं. पण हे ठिकाण नेमकं आहे कुठं आणि तिथं जेवणाच्या बदल्यात पैसे नाही तर प्लास्टिकच का द्यावं लागते माहिती आहे?

कुठे आहे हे हॉटेल?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरातमधील जुनागढमध्ये एक अनोखा प्लास्टिक कॅफे बनवला आहे. त्याचं नाव आहे नॅचरल प्लास्टिक कॅफे. देशभरातील प्लास्टिकशी संबंधित समस्येवर येथे उपाय सापडला आहे. इथं प्लास्टिक देऊन अन्न मिळतं. म्हणजे तुम्ही जे काही ऑर्डर कराल त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत, तर ठराविक प्रमाणात प्लास्टिक द्यावं लागेल. हा कॅफे ३० जून रोजी सुरू झाला होता.

या कॅफेमध्ये ग्राहक घरातून प्लास्टिकचा कचरा आणतात. येथे प्लास्टिकच्या वजनानुसार अन्न दिलं जातं. उदाहरणार्थ, एका ग्लास लिंबू पाण्यासाठी, तुम्हाला ५०० ग्रॅम प्लास्टिक द्यावं लागेल. दुसरीकडं ढोकळ्याची, थालीपीठ किंवा पोह्यांची एक थाळी घ्यायची असेल तर १ किलो प्लास्टिक आणावं लागते. साधी गोष्ट म्हणजे जेवढं प्लास्टिक जास्त तेवढं अन्न जास्त. कॅफेमध्ये फक्त सेंद्रिय फळं आणि भाज्या वापरल्या जातात. तसंच, या कॅफेमध्ये शिजवलेलं अन्न केवळ टिकाऊ भांड्यांमध्ये दिलं जातं.

हेही वाचा – आता खायला मिळणार ‘सुष्मिता आंबा’ आणि ‘अमित शाह आंबा’..! नेमकी भानगड काय? वाचा!

हा कॅफे सर्वोदय सखी मंडळाच्या महिला चालवतात. ही संस्था थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय फळं आणि भाजीपाला घेते. याशिवाय कॅफेच्या पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाकडून पूर्ण मदत करण्यात आली आहे. वृत्तानुसार, दिल्लीच्या नजफगड आणि छत्तीसगडमध्येही असे कॅफे आहेत जिथं प्लास्टिकचा कचरा देऊन खाद्यपदार्थ विकत घेतले जाऊ शकतात.

मेनूमध्ये काय?

सुपारीची पानं, गुलाब, अंजीर आणि बेलच्या पानांपासून बनवलेल्या काही आरोग्यदायी पेयांसह सर्व पेये मातीच्या भांड्यांमध्ये दिली जातील. मेनूमध्ये काठियावाडी आणि गुजराती थाळीचाही समावेश आहे ज्यात वांगी भरता, शेव तमेटा, थेपला आणि बाजरीचा रोटलो असेल. अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, जिल्हा प्रशासनानं या कचऱ्याची खरेदी करणारी एजन्सी नेमली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment