

Konkan Railway : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा – Bank Locker Rules : बँकेत लॉकर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..! RBI ची ‘मोठी’ घोषणा; नक्की वाचा!
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पोहोच मार्गाचे काँक्रिटीकरण व त्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा सामंजस्य करार आज पार पडला.#Kokan #रायगड #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #Maharashtra pic.twitter.com/nKyo38E1Kk
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) January 23, 2023
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्रीचव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.